Skip to content
यशायाह ७:१७-२५

यशायाह ७:१७-२५

१७
एफ्राईम आणि यहूदीया विभक्त झाले त्या वेळेपासून अशी वेळ आली नव्हती, तशी वेळ याहवेह तुमच्यावर आणि तुमच्या लोकांवर आणि तुमच्या पित्याच्या घराण्यावर आणतील—ते अश्शूरच्या राजाला आणतील.”
१८
त्या दिवशी याहवेह इजिप्तमधील नाईल नदीच्या मुखप्रदेशातील माशा आणि अश्शूर देशामधील मधमाशांना शिट्टी वाजवून बोलावतील.
१९
ते सर्व येतील आणि उतरत्या खोल दऱ्यांमध्ये, खडकांच्या कपाऱ्यांमध्ये, सर्व काटेरी झुडूपांवर आणि पाण्याच्या सर्व झऱ्यांवर वस्ती करतील.
२०
त्या दिवशी प्रभू फरात नदीच्या पलीकडून भाड्याने आणलेला वस्तरा—अश्शूरचा राजा—याचा उपयोग तुमची डोकी आणि गुप्तांगाचे मुंडण करण्यासाठी आणि तुमच्या दाढ्या कापण्यासाठीही करतील.
२१
त्या दिवशी एक मनुष्य एक कालवड आणि दोन शेळ्या जिवंत ठेवील.
२२
आणि ते भरपूर दूध देत असल्यामुळे खाण्यासाठी तिथे दही असेल. त्या देशात जे सर्व राहतील ते दही आणि मध खातील.
२३
त्या दिवशी, ज्या प्रत्येक ठिकाणी एक हजार द्राक्षवेली होत्या ज्याची किंमत एक हजार चांदीचे शेकेल होते त्या ठिकाणी तिथे फक्त काटेरी झुडपे आणि कुसळे असतील.
२४
शिकारी धनुष्य आणि बाण घेऊन तिथे जातील, कारण तेथील जमीन काटेरी झुडूपांनी आणि कुसळांनी झाकलेली असेल.
२५
एकेकाळी सर्व टेकड्या कुदळाने मशागत केल्या जात होत्या, तिथे आता तुम्ही काटेरी झुडपे आणि कुसळांच्या भीतीने कधीही जाणार नाही; जिथे गुरे मोकाट फिरतात आणि मेंढरे पळतात अशी ती ठिकाणे होतील.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options