Skip to content
एज्रा ३:१-७

एज्रा ३:१-७

यहूदीयाला परतलेले सर्व इस्राएली लोक आपआपल्या शहरात स्थायिक झाल्यावर ते सातव्या महिन्यात यरुशलेममध्ये एकत्र आले.
नंतर योसादाकाचा पुत्र येशूआने आपल्या बरोबरीच्या याजकांना आणि शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल व त्याच्या बंधूना बरोबर घेऊन इस्राएलांच्या परमेश्वराची वेदी पुन्हा बांधली आणि परमेश्वराचा मनुष्य मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे वेदीवर होमार्पणे वाहिली.
आसपासच्या राष्ट्रातील लोकांचे भय असून देखील ती वेदी आधीच्याच पायावर परत बांधण्यात आली आणि याहवेहस सकाळ संध्याकाळच्या होमार्पणांसाठी तिचा ताबडतोब उपयोग करण्यात आला.
मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी मंडपांचा सण पाळला व सणाच्या नियमानुसार प्रतिदिवसासाठी नेमलेले होमबली प्रत्येक दिवशी अर्पिले.
याशिवाय नेहमीचे होमबली आणि चंद्रदर्शनाचे व सर्व सणांचे बली, तसेच याहवेहच्या इतर वार्षिक उत्सवांचे बली व लोकांनी याहवेहसाठी स्वखुशीने आणलेले बली त्यांनी अर्पण केले.
याहवेहच्या मंदिराचा पाया अद्याप घातला गेला नव्हता, तरी सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी याहवेहला होमार्पणे करण्यास सुरुवात केली.
नंतर त्यांनी गवंडी व सुतार मोलमजुरीने लावले व सोर आणि सीदोन येथील लोकांकडून गंधसरूचे ओंडके विकत घेतले आणि त्याबद्दल त्यांनी त्यांना धान्य, द्राक्षारस व जैतुनाचे तेल दिले. हे ओंडके लबानोन पर्वतावरून आणण्यात आले व भूमध्य समुद्राच्या किनार्‍याने जलमार्गाने त्यांना याफो येथे पोचते करण्यात आले. हे सर्व पर्शियाचा राजा कोरेशच्या परवानगीने करण्यात आले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options