यहेज्केल २८:१-१०
१
याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
२
“मानवपुत्रा, सोरच्या अधिपतीला सांग: सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘आपल्या अंतःकरणातील गर्वाने तू म्हणालास, “मी देव आहे; देवाच्या आसनावर समुद्राच्या हृदयात मी बसतो.” तुला वाटते की तू देवासारखा सुज्ञ आहे, परंतु तू मानव आहेस आणि देव नाही.
३
तू दानीएलापेक्षा सुज्ञ आहेस काय? तुझ्यापासून काही गुपित नाही काय?
४
तुझी सुज्ञता व समज याद्वारे तू आपल्यासाठी संपत्ती मिळविली आणि आपल्या खजिन्यात सोने आणि चांदीचा साठा केलास.
५
व्यापारातील तुझ्या महान कुशलतेने तू आपले धन वाढविलेस, आणि तुझ्या संपत्तीमुळे तुझे हृदय गर्विष्ठ झाले आहे.
६
“ ‘यास्तव सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘कारण तू स्वतःला ज्ञानी, अगदी देवासारखे ज्ञानी समजतोस,
७
म्हणून मी परकीय लोकांना तुझ्याविरुद्ध आणेन, जे राष्ट्रांमध्ये सर्वात क्रूर आहेत; तुझे सौंदर्य व ज्ञान याविरुद्ध ते त्यांची तलवार उपसतील आणि ती तुझ्या चमकत्या वैभवाला भेदून जाईल.
८
ते तुला खाली गर्तेत आणतील, आणि तिथे समुद्राच्या मधोमध तुझा भयानक मृत्यू होईल.
९
तेव्हा जे लोक तुला मारतात त्यांच्यादेखत तू म्हणशील काय, “मी देव आहे?” जे तुझा वध करतात त्यांच्या हातात, तू केवळ मानव असशील, देव नाही.
१०
परकीय लोकांच्या हातून तू बेसुंती लोकांसारखा मृत्यू पावशील. हे मी बोललो आहे, असे सार्वभौम याहवेह म्हणतात.’ ”
Settings