दानीएल ११:३६-४५
३६
“राजा स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागेल; सर्व दैवतांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत असे तो म्हणेल. तो देवाधिदेवाचीही निंदा करेल आणि त्याची महासंकटकाळाच्या शेवटपर्यंत भरभराट होईल. कारण जे ठरवून दिले आहे ते नक्कीच घडेल.
३७
तो आपल्या पूर्वजांच्या दैवतांचा आदर करणार नाही, किंवा स्त्रियांच्या इच्छांची पर्वा करणार नाही, किंवा कोणत्याही दैवताचा आदर करणार नाही, परंतु तो स्वतःला त्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ ठरवेल.
३८
पण त्यांच्याऐवजी तो दुर्गदैवतांचा सन्मान करेल; जे दैवत त्याच्या पूर्वजांना माहीत नव्हते त्यांचा सन्मान तो सोने, चांदी, मौल्यवान रत्ने आणि किमती देणग्या यांनी करेल.
३९
तो या परकीय दैवतांच्या साहाय्याने मजबूत किल्ल्यांवर आक्रमण करेल आणि जे त्याचा राजा म्हणून स्वीकार करतील त्यांचा आदर करेल. तो त्यांना अनेक लोकांवर अधिकारी म्हणून नियुक्त करेल आणि बक्षीस म्हणून त्यांना जमीन वाटून देईल.
४०
“अखेरच्या काळात दक्षिणेचा राजा त्याच्यावर हल्ला करेल आणि उत्तरेचा राजा वादळी झंझावातासारखा रथ, घोडेस्वार आणि पुष्कळ जहाजे घेऊन त्याच्यावर हल्ला करेल. तो अनेक देशांवर स्वार्या करेल आणि एखाद्या महापुराप्रमाणे त्यांच्यामधून निघून जाईल.
४१
तो सुंदर देशावर आक्रमण करेल. पुष्कळ देशांची उलथापालथ होईल, पण एदोम, मोआब आणि अम्मोनचे प्रमुख त्याच्या तावडीतून सुटतील.
४२
तो अनेक देशांवर आपल्या शक्तीचा विस्तार करेल; इजिप्त देश देखील सुटणार नाही.
४३
तो इजिप्त देशामधील सोन्याच्या व चांदीच्या खजिन्यांवर व सर्व मौल्यवान वस्तूंवर ताबा मिळवेल, लिबिया व कूशी हे देश त्याचे दास होतील.
४४
परंतु पूर्वेकडून व उत्तरेकडून येणार्या बातम्यांनी तो अस्वस्थ होईल आणि मोठ्या क्रोधाने पुष्कळांचा नाश आणि अनेकांना नाहीसे करण्यास बाहेर पडेल.
४५
समुद्राच्या मध्यभागी असलेल्या सुंदर पवित्र पर्वताजवळ तो आपला शाही तंबू उभारेल. तरीही त्याचा अंत होईल आणि त्याच्या साहाय्यासाठी कोणीही नसेल.
Settings