Skip to content
प्रेषित १९:२४-४१

प्रेषित १९:२४-४१

२४
देमेत्रिय नावाच्या चांदीच्या कारागिराने अर्तमीस देवीचे चांदीचे देव्हारे तयार करून तेथील कारागिरांना पुष्कळ उद्योग मिळवून दिला होता.
२५
एकदा त्याने या सारखाच व्यवसाय करणार्‍या कारागिरांनादेखील एकत्र बोलाविले आणि तो त्यांना म्हणाला: “माझ्या मित्रांनो, या धंद्यात आपल्याला चांगला फायदा होत आहे, हे आपल्याला माहीतच आहे.
२६
तुम्ही पाहता व ऐकता की इफिसातच केवळ नव्हे तर बहुतेक सर्व आशिया देशातील बहुसंख्य लोकांची या पौलाने खात्री पटवली आहे व त्यांना चुकीची कल्पना करून दिली आहे. तो म्हणतो की मानवी हातांनी तयार केलेली दैवते मुळीच परमेश्वर नाहीत.
२७
आता यामध्ये धोका हा आहे की, आपल्या धंद्याचे चांगले नाव नाहीसे होईल, इतकेच नव्हे तर महादेवी अर्तमीसच्या मंदिराची सुद्धा अपकीर्ती होईल आणि ही देवता, जिची उपासना सर्व आशियामध्ये व जगामध्ये केली जाते, तिचे दैवी वैभव लुटून नेले जाईल.”
२८
त्यांनी हे ऐकले, तेव्हा ते क्रोधाविष्ट झाले व मोठमोठ्याने ओरडू लागले: “इफिसकरांची अर्तमीस थोर आहे!”
२९
लवकरच संपूर्ण शहरात एकच गोंधळ माजला. पौलाचे प्रवासातील सोबती, मासेदोनियाकर गायस व अरिस्तार्ख, यांना लोकांनी अटक केली आणि त्यांना नाटकगृहाकडे ओढून नेले.
३०
समुदायापुढे स्वतः जावे, असे पौलाच्या मनात होते, परंतु शिष्य त्याला तसे करू देईनात.
३१
त्या प्रांतातील काही अधिकारी, पौलाचे मित्र, यांनी देखील त्याला निरोप पाठविला व नाटकगृहात प्रवेश करू नये अशी त्याला विनंती केली.
३२
सभेत गोंधळ माजलेला होता: कोणी काही, तर इतर दुसरेच काहीतरी म्हणत होते. खरे म्हणजे, बहुतेकांना आपण येथे कशासाठी आलो आहोत हे देखील माहीत नव्हते.
३३
काही यहूद्यांनी आलेक्सांद्राला पुढे ढकलले, मग आलेक्सांद्राने लोकांपुढे बचावाचे भाषण करण्यासाठी, शांत व्हावे म्हणून हाताने खुणावले.
३४
परंतु तो यहूदी आहे हे समजल्यावर, सुमारे दोन तास, “इफिसकरांची अर्तमीस थोर!” अशी आरोळी ते एका सुरात मारीत राहिले.
३५
सरतेशेवटी नगर लेखनिकाने जमावाला शांत करून म्हटले: “इफिसच्या नागरिकांनो, स्वर्गातून खाली पडलेल्या त्या थोर अर्तमीसच्या मूर्तीचे व मंदिराचे संरक्षक इफिस शहर आहे, हे सर्व जगाला माहीत नाही का?
३६
तरी, या गोष्टी निर्विवाद आहेत, म्हणून तुम्ही शांत राहा व उतावळेपणाने भलतेच काही करू नका.
३७
तुम्ही या माणसांना येथे आणले आहे, त्यांनी मंदिरे लुटली नाहीत व आपल्या देवीची निंदाही केली नाही.
३८
जर देमेत्रिय आणि त्याच्या बरोबरच्या कारागिरांना कोणाविरुद्ध काही तक्रार असेल तर न्यायालये उघडी आहेत आणि न्यायाधीशही आहेत. ते आरोप करू शकतात.
३९
जर यापेक्षा इतर गोष्टी असतील तर, त्या न्यायसभेमध्ये मिटविता येतील.
४०
वास्तविक, आजच्या घटनांमुळे आपल्यावर दंगल केल्याचा आरोप येण्याचा धोका आहे, तेव्हा याचे विशिष्ट कारण आपल्याला देता येणार नाही, कारण या दंगलीस तसे काही कारण नव्हते.”
४१
असे बोलून त्याने सभा बरखास्त केली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options