Skip to content
प्रेषित १०:२४-३३

प्रेषित १०:२४-३३

२४
दुसर्‍या दिवशी ते कैसरीयास पोहोचले. कर्नेल्य त्यांची वाटच पाहत होता, त्याने आपले नातेवाईक व जवळचे मित्र यांना एकत्रित बोलाविले होते.
२५
पेत्राने घरात प्रवेश करताच, कर्नेल्याने त्याची भेट घेतली आणि आदराने त्याच्या पाया पडला.
२६
परंतु पेत्राने त्याला उभे केले व म्हणाला, “उभे राहा, मी स्वतः तुमच्यासारखाच एक मनुष्य आहे.”
२७
त्याच्याशी बोलत असताना, पेत्र आत गेला आणि तिथे त्याला पुष्कळ लोक एकत्र जमलेले आढळले.
२८
तेव्हा पेत्र त्यांना म्हणाला: “माझ्यासारख्या यहूदी व्यक्तीने गैरयहूदीयाला भेटणे व त्यांच्याशी संबंध ठेवणे हे यहूदी नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे हे तुम्हाला माहीतच आहे. परंतु परमेश्वराने मला दाखवून दिले आहे की, मी कोणालाही अपवित्र किंवा अशुद्ध लेखू नये.
२९
म्हणूनच मला बोलाविणे आल्याबरोबर, काहीही हरकत न घेता मी लगेच आलो. आता तुम्ही मला कशासाठी बोलाविले ते सांगा?”
३०
कर्नेल्याने उत्तर दिले: “तीन दिवसांपूर्वी माझ्या घरी याच वेळेस दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास, मी प्रार्थना करीत होतो. तेव्हा तेजस्वी झगा घातलेला एक पुरुष एकाएकी माझ्यासमोर उभा राहिला.
३१
आणि मला म्हणाला, ‘कर्नेल्या, परमेश्वराने तुझी प्रार्थना ऐकली आहे. तू गरिबांना केलेल्या दानधर्माची त्यांनी आठवण केली आहे.
३२
आता योप्पा येथे शिमोन ज्याला पेत्र म्हणतात त्याला बोलावून घे. ज्याचे घर समुद्राकाठी आहे त्या शिमोन चांभाराच्या घरी तो पाहुणा आहे.’
३३
म्हणून मी ताबडतोब तुम्हाला बोलावून घेतले आहे, तुम्ही आला हे बरे झाले. आपण सर्व येथे परमेश्वराच्या समक्षतेत आहोत आणि प्रभूने जे सर्वकाही सांगण्याची आज्ञा देऊन तुम्हाला पाठविले आहे ते सांगा.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options