2 राजे ९:११-२०
११
येहू आपल्या सोबतच्या अधिकार्यांकडे परत आला. त्यापैकी एकाने त्याला विचारले, “सर्वकाही ठीक आहे ना? हा वेडा तुझ्याकडे का आला होता?” येहूने उत्तर दिले, “तो कोण होता व त्याचे बोलणे हे तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे.”
१२
तेव्हा ते म्हणाले, “हे सत्य नाही, खरे काय आहे ते आम्हाला सांग.” येहूने म्हटले, “त्याने मला म्हटले: ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझा इस्राएलाचा राजा होण्यासाठी अभिषेक करत आहे.’ ”
१३
हे ऐकून त्यांनी ताबडतोब त्याच्यासमोर पायर्यांवर आपल्या अंगरख्याच्या पायघड्या घातल्या व कर्णा वाजवून ते ओरडून म्हणाले, “येहू राजा झाला आहे.”
१४
निमशीचा पुत्र यहोशाफाटचा पुत्र येहूने योराम राजाविरुद्ध बंड पुकारले. (त्यावेळेस योराम राजा सर्व सैन्यानिशी रामोथ गिलआद येथे अरामचा राजा हजाएलविरुद्ध इस्राएलांच्या बाजूने लढत होता.
१५
पण यहोराम राजा हा अरामचा राजा हजाएलशी लढताना ज्या जखमा अरामी लोकांनी दिल्या होत्या, त्या जखमा बर्या व्हाव्यात म्हणून तो येज्रीलला परतला होता.) येहू म्हणाला, “मी राजा व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल, तर आपण काय केले आहे हे कोणीही या नगरीतून निसटून ही बातमी येज्रीलमध्ये कोणालाही कळवू नये म्हणून खबरदारी घ्या.”
१६
मग येहू रथात बसला आणि येज्रीलास गेला, कारण योराम तिथे विसावा घेत होता आणि यहूदीयाचा राजा अहज्याह त्याला भेटण्यास खाली गेला होता.
१७
येज्रीलच्या बुरुजावर असलेला पहारेकरी येहू व त्याची टोळी येताना पाहून ओरडून म्हणाला, “मला एक टोळी येताना दिसत आहे.” यहोरामाने आदेश दिला, “एका घोडेस्वारास त्यांना भेटण्यास पाठवा, जो त्यांना विचारेल, शांतीने येत आहात ना?”
१८
तेव्हा एक घोडेस्वार येहूला भेटण्यास गेला आणि म्हणाला, “राजाने असे म्हटले आहे: ‘तुम्ही शांतीने आला आहात का?’ ” येहूने उत्तर दिले, “तुला शांतीचे काय घेणे देणे? चल, माझ्यामागे हो!” तेव्हा पहारेकर्याने बातमी दिली, “आपला दूत तिथे पोहोचला, तो येणार्यांना भेटला, पण तो परत येत नाही.”
१९
मग राजाने दुसर्या घोडेस्वाराला पाठविले. तो त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, राजाने असे म्हटले आहे: तुम्ही शांतीने आला आहात का? येहूने उत्तर दिले, “तुला शांतीचे काय घेणे देणे? चल, माझ्यामागे हो!”
२०
पहारेकर्याने बातमी दिली, “तो तिथे पोहोचला, पण तो ही परत येताना दिसत नाही. त्याचे घोडे हाकणे तर निमशीचा पुत्र येहूसारखे आहे—तो घाईने हाकीत आहे.”
Settings