2 राजे ५:१-८
१
नामान हा अरामाच्या राजाच्या सैन्याचा सेनापती होता. तो त्याच्या स्वामीच्या नजरेत एक थोर आणि अत्यंत आदरणीय होता, कारण याहवेहने त्याच्याद्वारे अरामाला विजय मिळवून दिला होता. तो एक पराक्रमी वीरपुरुष होता; परंतु त्याला कुष्ठरोग झाला होता.
२
आता अरामातून टोळी बाहेर गेली आणि त्यांनी इस्राएलातील एका लहान मुलीला गुलाम म्हणून नेले आणि ती नामानाच्या पत्नीची सेवा करू लागली.
३
एके दिवशी ती मुलगी आपल्या धनिणीला म्हणाली, “आपल्या स्वामींनी शोमरोनातील संदेष्ट्याची भेट घेतली असती तर किती बरे झाले असते! तो त्यांचा कुष्ठरोग बरा करू शकला असता.”
४
ही इस्राएली मुलगी काय म्हणते हे नामानाने जाऊन राजाला सांगितले.
५
तेव्हा अरामचा राजा म्हणाला, “मग आता जा आणि मी इस्राएलाच्या राजाला पत्र पाठवितो.” मग नामान आपल्याबरोबर चांदीचे दहा तालांत, सोन्याची सहा हजार सोन्याची नाणी आणि उंची पोशाखांचे दहा जोड घेऊन निघाला.
६
त्याने इस्राएलाच्या राजासाठी जे पत्र नेले, त्यामध्ये असे लिहिले होते: “या पत्रासोबत मी माझा सेवक नामानला तुमच्याकडे पाठवित आहे, तुम्ही त्याचे कुष्ठरोग बरे करावे.”
७
इस्राएलाच्या राजाने ते पत्र वाचले. तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली व म्हणाला, “मी परमेश्वर आहे काय? मी कोणाला मारून त्याला पुन्हा जिवंत करू शकतो काय? या व्यक्तीने कोणाला तरी माझ्याकडे कुष्ठरोग बरा होण्यासाठी का पाठविले आहे? पाहा तो कसा माझ्यासोबत भांडण करण्याचे काहीतरी निमित्त शोधीत आहे!”
८
इस्राएलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली आहेत, असे जेव्हा परमेश्वरचा मनुष्य अलीशाने ऐकले, तेव्हा त्याने राजाला हा निरोप पाठविला: “तुम्ही आपली वस्त्रे का फाडली? त्या व्यक्तीला माझ्याकडे पाठवून द्या आणि त्याला समजून येईल की इस्राएलमध्ये संदेष्टा आहे.”
Settings