2 राजे ४:८-१७
८
एके दिवशी अलीशा शूनेम येथे गेला आणि तिथे एक प्रतिष्ठित स्त्री राहत होती, तिने त्याला भोजनासाठी आग्रह केला. जेव्हा तो त्या मार्गाने जाई, तेव्हा तेव्हा तो तिच्या घरी भोजनासाठी उतरत असे.
९
ती आपल्या पतीला म्हणाली, “मला माहीत आहे की हा मनुष्य जो वरचेवर आपल्या मार्गाने येतो, तो परमेश्वराचा पवित्र मनुष्य आहे.
१०
तेव्हा त्यांच्यासाठी आपण धाब्यावर एक लहानशी खोली तयार करू. तिथे त्यांच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची व एक दिवा ठेवू. म्हणजे जेव्हा ते येतील तेव्हा इथे राहू शकतील.”
११
एके दिवशी अलीशा तिथे आला आणि त्याच्या खोलीत जाऊन विसावा घेतला.
१२
त्याने आपला सेवक गेहजीला म्हटले, “शूनेमकरीच्या स्त्रीला बोलव.” त्याने तिला बोलाविले आणि ती त्याच्यापुढे उभी राहिली.
१३
अलीशा गेहजीला म्हणाला, “तिला सांग, ‘तू आमच्यासाठी या सर्व त्रासातून गेली आहेस. आम्ही तुझ्यासाठी काय करू शकतो? राजापुढे किंवा सेनाधिकार्यांपुढे तुझ्या वतीने बोलावे काय?’ ” तिने उत्तर दिले, “मी तर माझ्या लोकांमध्येच राहते.”
१४
अलीशाने गेहजीला विचारले, “आपण तिच्यासाठी काय करू शकतो?” गेहजी म्हणाला, “तिला मूल नाही व आता तिचा पती वृद्ध झाला आहे.”
१५
मग अलीशाने म्हटले, “तिला बोलावून आण.” म्हणून त्याने तिला बोलाविले आणि ती दारातच उभी राहिली.
१६
अलीशा तिला म्हणाला, “पुढील वर्षी यावेळेस तू आपल्या पुत्रास उराशी धरशील.” ती म्हणाली, “माझ्या स्वामी, नाही, परमेश्वराच्या मनुष्या, कृपया तुम्ही मला अशी खोटी अाशा देऊ नका!”
१७
पण अलीशाने तिला सांगितल्याप्रमाणे ती स्त्री गर्भवती झाली आणि पुढच्या वर्षी वसंतॠतूत तिने एका पुत्राला जन्म दिला.
Settings