2 राजे २:१२-१८
१२
अलीशाने हे पाहिले आणि आरोळी मारली, “हे माझ्या पित्या! माझ्या पित्या! अहो इस्राएलांच्या रथांनो आणि इस्राएलांच्या सारथ्यांनो!” आणि अलीशा त्याला पुन्हा पाहू शकला नाही. तेव्हा अलीशाने आपला झगा फाडला आणि त्याचे दोन तुकडे केले.
१३
तेव्हा अलीशाने एलीयाहच्या अंगावरून पडलेला झगा उचलला आणि तो यार्देन काठी परत गेला आणि उभा राहिला.
१४
त्याने एलीयाहच्या अंगावरून पडलेला झगा घेतला आणि पाण्यावर मारला. “एलीयाहचा याहवेह परमेश्वर कुठे आहेत?” जेव्हा त्याने झग्याने पाण्यावर मारले तेव्हा पाणी हे उजवीकडे आणि डावीकडे दुभंगले आणि अलीशा पैलतीरावर गेला.
१५
यरीहोतील संदेष्ट्यांचा एक समूह, जो हे पाहत होता म्हणाला, “एलीयाहचा आत्मा अलीशावर उतरला आहे.” ते त्याला भेटण्यास गेले आणि भूमीपर्यंत लवून त्याला नमन केले.
१६
ते त्याला म्हणाले, “पाहा, तुमच्या सेवकांकडे पन्नास बळकट पुरुष आहेत. त्यांना जाऊ द्या आणि तुमच्या स्वामीचा शोध घेऊ द्या. याहवेहच्या आत्म्याने त्यांना एखाद्या पर्वतशिखरावर, नाहीतर एखाद्या दरीत नेऊन टाकले असेल.” अलीशा म्हणाला, “नको, त्यांना पाठवू नका.”
१७
परंतु त्यांनी त्याला लाजिरवाणे वाटेपर्यंत आग्रह केला. तेव्हा तो म्हणाला, “त्यांना पाठवा.” आणि त्यांनी पन्नास पुरुषांना पाठविले, ज्यांनी त्याचा तीन दिवस शोध घेतला, परंतु ते त्याला शोधू शकले नाही.
१८
जेव्हा ते अलीशाकडे परत आले, तेव्हा अलीशा यरीहोतच होता, तो त्यांना म्हणाला, “तुम्ही जाऊ नका असे मी तुम्हाला सांगितले नव्हते काय?”
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings