2 राजे १२:४-१६
४
यहोआश याजकांना म्हणाला, “याहवेहच्या मंदिरात पवित्र अर्पण म्हणून आणलेले सर्व पैसे, शिरगणतीत जमा केलेले पैसे, वैयक्तिक नवसातून मिळालेले पैसे आणि मंदिरात स्वेच्छेने आणलेले सर्व पैसे जमा करा.
५
प्रत्येक याजकाने त्याच्या खजिनदारांपैकी एकाकडून पैसे घ्यावे आणि नंतर मंदिरात जी काही मोडतोड झाली असेल ती दुरुस्त करावी.”
६
परंतु यहोआश राजाच्या कारकिर्दीतील तेवीस वर्षापर्यंत याजकांनी मंदिराची डागडुजी केली नव्हती.
७
तेव्हा यहोआश राजाने यहोयादा याजक व इतर याजकांना बोलाविले आणि विचारले, “तुम्ही मंदिराची डागडुजी अजूनही का केली नाही? तुमच्या खजिनदारांकडून आणखी पैसे घेऊ नका, तर तो पैसा आता मंदिराच्या डागडुजीसाठी देण्यात यावा.”
८
मग याजकांनी सहमती दर्शविली की ते लोकांकडून आता पैसा घेणार नाही आणि तसेच ते मंदिराची डागडुजी देखील करणार नाही.
९
यहोयादा याजकाने एक पेटी घेतली व तिच्या झाकणाला एक छिद्र पाडले. ती पेटी त्याने याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ वेदीच्या उजव्या बाजूला ठेवली. प्रवेशद्वाराचे पहारेकरी याजक याहवेहच्या मंदिरात आणलेले सर्व पैसे पेटीत घालू लागले.
१०
जेव्हाही ते पाहत की पेटीमध्ये अधिक पैसा जमा झाला आहे, तेव्हा राजाचा चिटणीस आणि प्रमुख याजक येत आणि याहवेहच्या मंदिरात आलेला पैसा मोजून पिशव्यांत भरून ठेवीत असे.
११
रक्कम मोजून आणि तोलून झाल्यानंतर मंदिराच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेल्या माणसांना पैसे देण्यात येत असत. त्याद्वारे त्यांनी याहवेहच्या मंदिरावर काम करणारे सुतार आणि बांधकाम करणारे,
१२
गवंडी आणि दगड फोडणारे यांना पैसे दिले. त्यांनी याहवेहच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी लाकूड आणि दगड घडविणे केले आणि मंदिराच्या दुरुस्तीचे इतर सर्व खर्च पूर्ण केले.
१३
जो पैसा मंदिरामध्ये आणत होते याच्यात याहवेहच्या मंदिरात वापरण्यात येणारे चांदीचे पेले, कातऱ्या, वाट्या, कर्णे किंवा सोन्या-चांदीच्या इतर साहित्य यावर खर्च करण्यात आला नाही;
१४
तर हा पैसा कामगारांना पुरविला जात होता जे याहवेहच्या मंदिराची डागडुजी करीत होते.
१५
ज्याच्या स्वाधीन हा पैसा कामगारांना देण्यासाठी होता त्यांच्याकडून पैशाचा हिशोब घेण्याची गरज नव्हती, कारण त्यांनी पूर्ण प्रामाणिकपणे काम केले.
१६
त्याचप्रमाणे दोषार्पणाचा आणि पापार्पणाचा पैसा याहवेहच्या मंदिरात आणला नाही; तो याजकांचा होता.
Settings