2 करिंथकरांस १:३-११
३
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता आणि आपला परमेश्वर, करुणेचा पिता आणि सर्व सांत्वन करणारे परमेश्वर यांची स्तुती असो.
४
ते आपल्या सर्व दुःखांमध्ये आपले सांत्वन करतात, यासाठी की जे सांत्वन आम्हाला परमेश्वराकडून मिळाले आहे, त्या सांत्वनाने जे कोणत्याही दुःखात आहेत त्यांचे सांत्वन करावे.
५
ज्याप्रकारे आम्ही ख्रिस्ताच्या अगणित दुःखांमध्ये सहभागी आहोत, त्याच प्रकारे आमचे सांत्वनही ख्रिस्ताद्वारे विपुल होते.
६
जर आम्ही दुःखी आहोत तर ते तुमच्या सांत्वनासाठी व तारणासाठी; जर आम्हाला सांत्वन लाभले आहे, तर ते तुमच्या सांत्वनासाठी, यासाठी की जी दुःखे आम्ही सोसतो व जी तुम्हीही सोसत आहात, त्यामुळे तुम्हामध्ये धीर व सहनशीलता उत्पन्न व्हावी
७
आणि तुमच्याबद्दलची आमची आशा स्थिर आहे व जसे तुम्ही आमच्या दुःखामध्ये तसेच आमच्या सांत्वनातही सहभागी झाला आहात.
८
प्रिय बंधूंनो व भगिनींनो, आशिया प्रांतात ज्या दुःखाच्या अनुभवातून आम्हास जावे लागले, त्याबद्दल तुम्ही अज्ञानी असावे अशी आमची इच्छा नाही. आमच्या सहनशक्तीपलीकडे आम्ही ओझ्याखाली अगदी दबून गेलो की; आम्ही जीवनाची आशा सोडून दिली होती.
९
खरोखर आम्हाला मृत्यूची दंडाज्ञा ठरलेली आहे असे वाटले, हे यासाठी झाले की आम्ही केवळ स्वतःवर अवलंबून न राहता, जे मृतांना उठवितात त्या परमेश्वरावरच अवलंबून राहावे.
१०
त्यांनी आम्हाला मरणाच्या धोक्यातून सोडविले आणि ते पुन्हा आम्हाला असेच सोडवतील. आम्ही त्यांच्यावर आशा ठेवली आहे की ते आम्हाला असेच पुढेही सोडवित राहतील.
११
परंतु तुम्हीही आमच्यासाठी प्रार्थना करून आम्हाला मदत करावी. कारण जो कृपेचा अनुग्रह सर्वांच्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून आम्हास मिळाला आहे, त्याबद्दल आमच्यावतीने अनेकजण परमेश्वराची स्तुती करतील.
Settings