2 इतिहास २०:२०-२५
२०
पहाटे ते तकोवाच्या वाळवंटाकडे निघाले. ते बाहेर पडले असताना यहोशाफाट उभा राहिला आणि म्हणाला, “यहूदीया आणि यरुशलेमच्या लोकांनो, माझे ऐका! याहवेह तुमचे परमेश्वर यांच्यावर विश्वास ठेवा आणि तुमचे समर्थन केले जाईल; त्याच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा आणि तुम्ही यशस्वी व्हाल.”
२१
लोकांबरोबर सल्लामसलत केल्यावर, यहोशाफाटने पुरुषांची नियुक्ती केली, याहवेहची स्तुती गाण्यासाठी आणि त्यांच्या पवित्रतेच्या वैभवाबद्दल त्यांची स्तुती करण्यासाठी जेव्हा ते सैन्याचे प्रमुख म्हणून निघाले तेव्हा ते म्हणाले: “याहवेहचे आभार माना, कारण त्यांचे प्रेम अनंतकाळ टिकते.”
२२
जेव्हा त्यांनी गाणे गाण्यास आणि स्तुती करण्यास सुरुवात केली लागले, तेव्हा याहवेहनी यहूदीयावर आक्रमण करणारे अम्मोनी, मोआब आणि सेईर पर्वताच्या लोकांवर दबा धरून हल्ला केला आणि शत्रूचा पराभव झाला.
२३
अम्मोनी आणि मोआबी लोक सेईर पर्वतावरील लोकांवर त्यांचा नाश करण्यासाठी आणि त्यांचा समूळ उच्छेद करण्यासाठी उठले. सेईर येथील माणसांची कत्तल करून झाल्यावर त्यांनी एकमेकांचा नाश करण्यास सुरुवात केली.
२४
जेव्हा यहूदीयाचे लोक जिथून वाळवंटातील दृश्य दिसत होते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी प्रचंड सैन्याकडे पाहिले, तेव्हा त्यांना जमिनीवर फक्त मृतदेह पडलेले दिसले; त्यातून कोणीही सुटला नव्हता.
२५
तेव्हा यहोशाफाट आणि त्याची माणसे त्यांची लूट घ्यायला निघाले, त्यांना त्याच्यामध्ये बरीच उपकरणे, वस्त्रे आणि मौल्यवान वस्तू सापडल्या—त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त तिथे होते. इतकी लूट होती की, ती गोळा करावयाला तीन दिवस लागले.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.