Skip to content
1 शमुवेल १५:१-९

अमालेकाचा पूर्णपणे नाश करण्याची शौलाला आज्ञा

1 शमुवेल १५:१-९
शमुवेल शौलास म्हणाला, “इस्राएल लोकांवर राजा म्हणून तुझा अभिषेक करण्यास याहवेहने मलाच पाठवले होते; तर आता याहवेहचा संदेश ऐक.
सर्वशक्तिमान याहवेह असे म्हणतात: ‘इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आले त्यावेळी अमालेकी लोकांनी त्यांना रस्त्यात कसे अडविले, त्यासाठी मी त्यांना शिक्षा करणार.
तर आता तू जा, अमालेक्यांवर हल्ला कर आणि त्यांचे जे काही आहे त्या सर्वांचा सर्वस्वी नाश कर. त्यांची गय करू नको; त्यांचे पुरुष व स्त्रिया, लेकरे व तान्ही बाळे, गुरे व मेंढरे, उंट व गाढवे हे सर्व मारून टाक.’ ”
तेव्हा शौलाने आपले सैन्य बोलाविले व तेलाईम येथे त्यांची मोजणी केली; ते दोन लक्ष पायदळ व यहूदीयातील दहा हजार सैनिक होते.
शौल अमालेक्यांच्या शहरात जाऊन तिथे खोर्‍यात दबा धरून राहिला.
मग शौल केनी लोकांना म्हणाला, “तुम्ही निघून जा, अमालेक्यांना सोडून जा, यासाठी की त्यांच्याबरोबर मी तुमचा नाश करू नये; कारण इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आले त्यावेळी तुम्ही त्यांच्याशी दयेने वागला.” तेव्हा केनी लोक अमालेक्यांमधून निघून गेले.
तेव्हा शौलाने हवीलापासून इजिप्तच्या पूर्वेकडील सीमेवरील शूरपर्यंत अमालेक्यांना मारले.
त्याने अमालेक्यांचा राजा अगाग याला जिवंत पकडले, आणि त्याच्या लोकांचा तलवारीने सर्वनाश केला.
परंतु शौलाने व त्याच्या सैन्याने अगाग राजाला जिवंत ठेवले, तसेच उत्तम मेंढरे, गुरे, पुष्ट वासरे व कोकरे; व सर्वकाही जे चांगले होते त्यांचा नाश करावा असे त्यांना वाटले नाही, म्हणून त्यांनी ते राखून ठेवले. मात्र जे टाकाऊ व कुचकामी होते त्यांचा त्यांनी नाश केला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options