Skip to content
1 राजे २१:१-१६

1 राजे २१:१-१६

काही काळानंतर, येज्रीली नाबोथच्या द्राक्षमळ्यासंबंधी एक घटना घडली, हा द्राक्षमळा अहाब राजाच्या शोमरोनातील येज्रील राजवाड्याजवळ होता.
अहाब नाबोथला म्हणाला, “तुझ्या द्राक्षमळ्यात मला भाजीपाल्याची बाग करू दे, कारण तो माझ्या राजवाड्याजवळ आहे. त्याचा मोबदला म्हणून मी तुला त्याहून चांगला द्राक्षमळा देईन किंवा तुझी इच्छा असली तर त्याचे योग्य मोल मी तुला देईन.”
परंतु नाबोथने अहाबाला उत्तर दिले, “माझ्या पूर्वजांचे वतन मी तुला द्यावे असे याहवेह माझ्या हातून कधी न घडवो.”
त्यामुळे अहाब खिन्न व रागाने भरून आपल्या घरी गेला कारण येज्रीली नाबोथने त्याला म्हटले, “माझ्या पूर्वजांचे वतन मी तुला देणार नाही.” अहाब रुसून व अन्न खाण्यास नाकारीत आपल्या बिछान्यावर पडून राहिला.
तेव्हा त्याची पत्नी ईजबेल आत आली व त्याला विचारले, “तुम्ही इतके खिन्न का आहात? तुम्ही अन्न का खात नाही?”
तो तिला म्हणाला, “कारण येज्रीली नाबोथला मी म्हणालो, ‘तुझा द्राक्षमळा मला विकत दे; नाहीतर तुझी इच्छा असली तर, त्याबदल्यात त्याच किमतीत मी तुला दुसर्‍या ठिकाणी द्राक्षमळा देईन.’ परंतु तो म्हणाला, ‘मी तुला माझा द्राक्षमळा देणार नाही.’ ”
त्याची पत्नी ईजबेल म्हणाली, “इस्राएलचा राजा असताना तुमचे वर्तन असे असावे काय? उठा आणि भोजन करा! आपले मन आनंदित करा. येज्रीली नाबोथचा द्राक्षमळा मी तुम्हाला मिळवून देईन.”
मग तिने अहाबाच्या नावाने पत्रे लिहिली, त्यावर त्याचा शिक्का मारला आणि नाबोथच्या शहरात त्याच्याबरोबर राहत असलेले वडीलजन व प्रतिष्ठित लोकांकडे ती पाठवली.
त्या पत्रांमध्ये तिने लिहिले: “शहरात उपास जाहीर करा आणि नाबोथला सर्वात महत्त्वाच्या स्थळी बसवा.
१०
परंतु त्याच्यासमोर दोन अधम व्यक्तींना बसवावे आणि ज्या परमेश्वराने आशीर्वाद दिला त्यांना व राजाला शाप दिल्याचा आरोप त्याच्यावर आणावा. मग त्याला बाहेर नेऊन तो मरेपर्यंत धोंडमार करा.”
११
तेव्हा नाबोथच्या शहरात राहत असलेल्या वडीलजन व प्रतिष्ठित लोकांनी ईजबेलने लिहिलेल्या पत्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे केले.
१२
त्यांनी उपास जाहीर केला व लोकांमधील अगदी महत्त्वाच्या स्थळी नाबोथला बसविले.
१३
मग दोन अधम व्यक्ती त्याच्यासमोर येऊन बसले आणि लोकांसमक्ष नाबोथविरुद्ध आरोप आणले. ते म्हणाले, “नाबोथने परमेश्वराला व राजाला शाप दिला आहे.” म्हणून त्यांनी त्याला शहराच्या बाहेर नेले आणि तो मरेपर्यंत त्याला धोंडमार केली.
१४
नंतर त्यांनी ईजबेलला निरोप पाठवून म्हटले: “नाबोथला धोंडमार करून जिवे मारले आहे.”
१५
येज्रीली नाबोथला धोंडमार करून मारले आहे हे ईजबेलने ऐकताच, ती अहाबाला म्हणाली, “उठा आणि ज्या येज्रीली नाबोथने तुम्हाला आपला द्राक्षमळा पैसे घेऊन देण्यास नाकारले त्याचा द्राक्षमळा ताब्यात घ्या. तो आता जिवंत नाही, तो मेला आहे.”
१६
येज्रीली नाबोथ मेला आहे असे जेव्हा अहाबाने ऐकले, तेव्हा तो उठला व नाबोथचा द्राक्षमळा ताब्यात घेण्यास निघाला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options