Skip to content
1 राजे १२:१-११

1 राजे १२:१-११

१
रेहोबोअम शेखेम येथे गेला, कारण इस्राएलचे सर्व लोक त्याला राजा करावे म्हणून तिथे गेले.
२
जेव्हा नेबाटाचा पुत्र यरोबोअमने हे ऐकले (तो शलोमोन राजापासून पळून अजूनही इजिप्त देशातच होता). तो इजिप्तवरून परत आला.
३
तेव्हा त्यांनी यरोबोअमला बोलावून घेतले, मग तो आणि इस्राएलची सर्व मंडळी रेहोबोअमकडे गेले व त्याला म्हणाले:
४
“तुमच्या पित्याने आमच्यावर भारी जू ठेवले, तर आता मजुरीचा हा कठीण भार व हे भारी जू आपण हलके करावे, म्हणजे आम्ही आपली सेवा करू.”
५
रेहोबोअमने उत्तर दिले, “तीन दिवसांसाठी माघारी जा आणि परत माझ्याकडे या.” तेव्हा लोक माघारी गेले.
६
तेव्हा त्याचा पिता शलोमोनच्या जीवनकाळात त्यांची सेवा केलेल्या वडीलजनांना रेहोबोअम राजाने विचारले, तो म्हणाला, “या लोकांना मी काय उत्तर द्यावे असे तुम्हाला वाटते?”
७
त्यांनी उत्तर दिले, “आज जर तुम्ही त्यांचा सेवक होऊन त्यांची सेवा केली व त्यांना अनुकूल उत्तर दिले, तर ते नेहमीच तुमचे सेवक म्हणून राहतील.”
८
पण रेहोबोअमने वडीलजनांचा सल्ला नाकारला आणि त्याच्याबरोबर वाढलेल्या व त्याच्या सेवेत असलेल्या तरुण पुरुषांचा सल्ला घेतला.
९
त्याने त्यांना विचारले, “जे लोक मला म्हणतात, ‘तुझ्या पित्याने आमच्यावर घातलेले जू हलके करावे,’ त्यांना मी काय उत्तर द्यावे?”
१०
त्याच्याबरोबर वाढलेल्या तरुणांनी उत्तर दिले, “हे लोक तुला म्हणाले आहेत की, ‘तुझ्या पित्याने आमच्यावर भारी जू ठेवले होते, तर आता हे भारी जू आपण हलके करावे.’ आता त्यांना सांग, ‘माझी करंगळी माझ्या पित्याच्या कमरेपेक्षाही जाड आहे.
११
माझ्या पित्याने तुमच्यावर भारी जू लादले; मी ते अजून भारी करेन. माझ्या पित्याने तुम्हाला चाबकाने मारले; तर मी तुम्हाला विंचवांनी मारीन.’ ”

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.