स्तोत्रसंहिता९०
Listen to this chapter
0:00
0:00
देव, आमचा सनातन आश्रय
१
परमेश्वराचे प्रिय पात्र, मोशेची एक प्रार्थना हे प्रभू, पिढ्यान् पिढ्या तुम्ही आमचे वसतिस्थान आहात.
२
पर्वत निर्माण होण्यापूर्वी, सृष्टीची घडण होण्यापूर्वी, अनादि ते अंतापर्यंत तुम्हीच परमेश्वर आहात!
मानवी जीवनाची क्षणभंगुरता
३
“मर्त्य मनुष्या, मातीत परत जा” असे शब्द बोलून, मनुष्याला तुम्ही मातीत परत पाठविता.
४
हजार वर्षे ही तुम्हाला असे आहेत, जसा कालचा गेलेला एक दिवस, किंवा रात्रीचा एक प्रहर.
५
तुम्ही लोकांना झटकन मृत करून असे नाहीसे करता— जसे सकाळचे हिरवेगार कोमल गवत:
६
ते सकाळी नवीन उगवते, पण सायंकाळपर्यंत करपून जाते.
पापाचा परिणाम म्हणून मर्त्यत्व
७
तुमच्या क्रोधाने आम्ही भस्म होतो; तुमच्या संतापाने आम्ही दडपून जातो.
८
तुम्ही आमचे अपराध आपल्यापुढे पसरून ठेवता; तुमच्या सानिध्यात आमची सर्व गुप्त पातकेही प्रकाशात येतात.
९
तुमच्या क्रोधाच्या छायेखाली आम्ही आमचे जीवन जगतो; कण्हत आमची वर्षे सरतात.
१०
आम्हाला सत्तर वर्षाचे आयुष्य दिले आहे; आणि सशक्त असल्यास ऐंशी वर्षे; परंतु यातील उत्तम वर्षेदेखील पुष्कळदा त्रास आणि दुःखे यांनीच भरलेली असतात; लवकरच ती सरतात आणि आम्ही निघून जातो.
११
तुमच्या संतापाची भयानकता जाणू शकलो असतो, तर बरे झाले असते! तुमचा क्रोध तितकाच व्यापक आहे, जितकी त्याची भीती.
ज्ञान व दयेसाठी प्रार्थना
१२
आमच्या जीवनाचे दिवस मोजणे आम्हाला शिकवा, जेणेकरून आमचे अंतःकरण सुज्ञ होईल.
१३
हे याहवेह, तुमच्या मनाला पाझर फुटू द्या, आणखी किती विलंब लागणार? आपल्या सेवकांवर दया करा.
१४
सकाळच्या समयी तुमच्या अक्षयप्रीतीने आम्हाला तृप्त करा, म्हणजे आम्ही आनंदात राहू व आमचे सर्व दिवस हर्षभरित होतील.
१५
तुम्ही जितके दिवस हालअपेष्टा भोगावयास लावले, तितके दिवस हर्षभरित करा, त्या वर्षांच्या प्रमाणात आता आम्हाला आनंद द्या.
१६
तुमची गौरवशाली कृत्ये तुमच्या सेवकांना दिसो, तुमचे वैभव त्यांची मुलेबाळे बघोत.
१७
आमच्या प्रभू परमेश्वराची कृपा आम्हावर होवो; आणि आमची सर्व कार्ये सुस्थिर होवोत— होय, आमच्या हाताच्या कार्यास सुस्थिरता येवो.
Use ← → arrow keys to navigate
Settings
Reading Style
Typeface
Font Size px
Reading Width chars
Options
Study Note