मुख्य मजकुरावर जा

स्तोत्रसंहिता१४३

देवाच्या विश्वासूपणाला व नीतिमत्तेला विनंती

दावीदाचे एक स्तोत्र. हे याहवेह, माझी प्रार्थना ऐका, कृपा करून माझ्या विनवणीकडे लक्ष द्या, तुमच्या विश्वासूपणा व नीतिमत्वास अनुसरून माझ्या मदतीच्या हाकेला उत्तर द्या.
आपल्या सेवकाचा न्याय करून त्याला शासन करू नका, कारण जीवितांमध्ये तुमच्यासमोर नीतिमान असा कोणीही नाही.

छळ व निराशेची तक्रार

माझ्या शत्रूने पाठलाग करून मला पकडले आहे; त्याने मला जमिनीवर तुडविले आहे; जसे दीर्घकाळाच्या मृतास ठेवावे, तसे त्याने मला अंधारात जखडून ठेवले आहे.
माझा आत्मा निराशेने व्याकूळ झाला आहे; भीतीने मी हतबल झालो आहे.

मननात आश्रय शोधणे

मला पुरातन काळचे स्मरण होत आहे; तुम्ही केलेल्या अद्भुत कृत्यांचे मी मनन करतो, आणि तुमचे हस्तकौशल्य माझ्या विचारांचा विषय आहे.
मी माझे हात तुमच्यापुढे पसरतो; शुष्क भूमीसारखा माझा जीव तुमच्यासाठी तहानलेला आहे. सेला

सुटका व मार्गदर्शनासाठी तातडीची प्रार्थना

हे याहवेह, त्वरेने मला उत्तर द्या; माझा आत्मा दुर्बल झाला आहे. तुम्ही आपले मुख माझ्यापासून लपवू नका, नाहीतर मी अधोलोकात जाणार्‍यासारखा होईन.
प्रातःकाळी तुमच्या वात्सल्याचा मला प्रेमसंदेश येऊ द्या, कारण मी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. माझे जीवन मी तुमच्या हातात सोपविले आहे, म्हणून मी कोणत्या मार्गाने चालावे ते मला दाखवा.
याहवेह, मला माझ्या शत्रूच्या तावडीतून सोडवा, कारण मी तुमच्यामध्ये लपलो आहे.
१०
तुमच्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला साहाय्य करा, कारण तुम्हीच माझे परमेश्वर आहात; तुमचा उत्तम आत्मा मला नीतिमार्गाने नेवो.
११
हे याहवेह, तुमच्या नावाचे गौरव व्हावे म्हणून माझे जीवन सुरक्षित ठेवा; तुमच्या नीतिमत्वास अनुसरून या संकटातून मला बाहेर काढा.
१२
माझ्यावरील तुमच्या अक्षय प्रीतीमुळे माझ्या शत्रूंचा नाश करा; माझ्या सर्व विरोधकांचा नायनाट करा, कारण मी तुमचा सेवक आहे.
Use arrow keys to navigate
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options