मुख्य मजकुरावर जा

निर्गम३१

निवासमंडपातील कारागीरांची नेमणूक

मग याहवेह मोशेला म्हणाले,
“पाहा, मी यहूदाहच्या गोत्रातील, हूराचा पुत्र उरी याचा पुत्र बसालेल याला निवडले आहे.
व मी त्याला परमेश्वराचा आत्मा, ज्ञान, समज, बुद्धी आणि सर्वप्रकारच्या कुशलतेने भरले आहे—
सोने, चांदी आणि कास्याचे कलाकौशल्य करण्यासाठी;
आणि पाषाण फोडून रत्ने घडवावी, लाकडाचे काम आणि सर्वप्रकारचे कलात्मक कारागिरीचे काम करण्यासाठी.
त्याचप्रमाणे, त्याला मदत करण्यासाठी दान गोत्रातील अहीसामाक याचा पुत्र ओहोलियाब याला मी नेमले आहे.
“जसे सभामंडप, कराराच्या नियमाचा कोश व त्यावरील प्रायश्चिताचे झाकण, आणि तंबूचे इतर सर्व साहित्य:
मेज व त्यावरील सर्व सामान, शुद्ध सोन्याचा दीपस्तंभ व त्याची सर्व उपकरणे, व धूपवेदी,
होमार्पणाची वेदी व तिची सर्व पात्रे, गंगाळ व त्याची बैठक.
१०
तसेच विणलेली वस्त्रे, अहरोन याजकासाठी पवित्र वस्त्रे, व याजक म्हणून सेवा करतात तेव्हा त्याच्या पुत्रांसाठी वस्त्रे,
११
अभिषेकाचे तेल व पवित्रस्थानासाठी सुगंधी धूप.

शब्बाथाचे चिन्ह

१२
मग याहवेह मोशेला म्हणाले,
१३
“इस्राएली लोकांना सांग, ‘तुम्ही माझे शब्बाथ अवश्य पाळावेत. येणार्‍या पिढ्यांपर्यंत हे माझ्या व तुमच्यामध्ये चिन्ह राहील, यासाठी की तुम्ही जाणावे की जो तुम्हाला पवित्र करतो, तो मीच याहवेह आहे.
१४
“ ‘शब्बाथ दिवस पाळावा, कारण तो तुम्हासाठी पवित्र आहे; जो कोणी तो अपवित्र करेल त्याला जिवे मारावे; जे कोणी त्या दिवशी काम करतील, त्यांना त्यांच्या लोकांतून काढून टाकले जावे.
१५
सहा दिवस काम करावे, परंतु सातवा दिवस हा विसाव्याचा शब्बाथ आणि याहवेहसाठी पवित्र आहे; शब्बाथ दिवशी जो काम करेल त्याला जिवे मारावे.
१६
इस्राएली लोकांनी निरंतरचा करार म्हणून पिढ्यान् पिढ्या शब्बाथ पाळावा.
१७
तो माझ्यामध्ये व इस्राएली लोकांमध्ये सदासर्वकाळचे चिन्ह असेल, कारण याहवेहने सहा दिवसात आकाश व पृथ्वी निर्माण केली आणि सातव्या दिवशी त्यांनी स्वस्थ राहून विसावा घेतला.’ ”

साक्षीच्या पाट्या

१८
जेव्हा याहवेहने सीनाय पर्वतावर मोशेबरोबर आपले बोलणे संपविले, तेव्हा त्यांनी मोशेला कराराच्या नियमाच्या दोन दगडी पाट्या दिल्या, ज्या परमेश्वराच्या बोटाने कोरलेल्या होत्या.
Use arrow keys to navigate
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options