रोमकरांस ६:१-१२
१
तर मग आपण काय म्हणावे? आपल्याला अधिक कृपा मिळावी म्हणून आपण पाप करीतच राहावे काय?
२
नक्कीच नाही! जे आपण पापाला मरण पावलो आहोत, ते आपण त्यात कसे जगू शकतो?
३
ज्या आपण सर्वांनी ख्रिस्त येशूंमध्ये बाप्तिस्मा घेतला, त्यांच्या मृत्यूमध्येही बाप्तिस्मा घेतला हे तुम्हाला माहीत नाही का?
४
यास्तव बाप्तिस्म्याद्वारे मरणाने आपण ख्रिस्ताबरोबर पुरले गेलो यासाठी की, ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवी शक्तीने मरणातून उठविले गेले, त्याचप्रमाणे आपणही पूर्णतः नवीन जीवन जगावे.
५
जर आपण त्यांच्या मरणामध्ये त्यांच्याशी अशा रीतीने संयुक्त झालो, तर त्यांच्या पुनरुत्थानामध्येही त्यांच्याशी खात्रीने संयुक्त होऊ.
६
आपल्याला माहीत आहे की आपला जुना स्वभाव त्यांच्याबरोबरच खिळला गेला व पापाच्या अधिकारात असलेले आपले शरीर निर्बल झाले म्हणून यापुढे आपण पापाचे गुलाम असू नये.
७
कारण जो कोणी मरण पावला आहे, तो पापापासून मुक्त झाला आहे.
८
आता जर आपण ख्रिस्ताबरोबर मेलो, तर त्यांच्याबरोबर जिवंतही होऊ असा आपला विश्वास आहे.
९
कारण आपल्याला ठाऊक आहे की, ख्रिस्त मरणातून उठविले गेले ते पुन्हा मरू शकत नाहीत; यापुढे त्यांच्यावर मरणाची सत्ता चालणार नाही.
१०
त्यांचे हे मरण पापासाठी एकदाच होते; पण आता जे जीवन ते जगतात, ते परमेश्वराकरिता जगतात.
११
याप्रमाणे, आपण पापाला मरण पावलेले आणि ख्रिस्त येशूंद्वारे परमेश्वरासाठी जिवंत झालेले असे माना.
१२
तुम्ही वाईट वासनांच्या स्वाधीन होऊ नये म्हणून तुमच्या मर्त्य शरीरावर पापाची सत्ता गाजवू देऊ नका.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings