Skip to content
स्तोत्रसंहिता ६८:१-११

स्तोत्रसंहिता ६८:१-११

१
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाची रचना. एक स्तोत्र. एक गीत. परमेश्वराने उठावे आणि त्यांच्या सर्व शत्रूंची दाणादाण होवो; त्यांचे वैरी त्याच्यापुढून पळून जावोत.
२
तुम्ही त्यांना धुरासारखे उडवून लावो— जसे अग्नी समक्ष मेण वितळते, तसे परमेश्वराच्या समक्षतेपुढून दुष्ट लोक नष्ट होवोत.
३
परंतु नीतिमान मनुष्य हर्ष करो; परमेश्वरापुढे आनंद करो; हर्षामुळे उल्लास करो.
४
परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गा, त्यांच्या नावाचे स्तवन करा, जे मेघांवर स्वार होतात, त्यांची महिमा करा; त्यांचे नाव याहवेह आहे—त्यांच्या समक्षतेत हर्ष करा.
५
परमेश्वर पितृहीनांचे पिता आणि विधवांचे न्यायदाता आहेत, ते आपल्या पवित्र निवासस्थानी आहेत.
६
एकाकी लोकांना ते कुटुंबात वसवितात, कैद्यांना ते तुरुंगातून मुक्त करतात, तेव्हा ते आनंदाने गाऊ लागतात; परंतु बंडखोरांच्या वाट्याला दुष्काळ आणि दुःखच येणार.
७
हे परमेश्वरा, जेव्हा तुम्ही तुमच्या लोकांच्या पुढे चाललात, जेव्हा तुम्ही रानातून चाललात, सेला
८
तेव्हा पृथ्वी थरथर कापली, परमेश्वरासमोर आकाशातून वृष्टी झाली, परमेश्वरासमोर, इस्राएलाच्या परमेश्वरासमोर सीनाय पर्वत कंपित झाला.
९
परमेश्वरा, तुम्ही मुबलक पाऊस दिला. तुम्ही तुमचा थकलेला वारसा ताजातवाना करता.
१०
तुमची प्रजा तिथे राहिली, परमेश्वरा, तुमच्या भांडारातून तुम्ही दयाळूपणाने गरिबांना मदत केली.
११
प्रभूने आज्ञा दिली आणि मोठ्या संख्येने महिलांनी मोठ्या आनंदाने या वार्तेचा प्रसार केला:

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.