स्तोत्रसंहिता ५५:१-८
१
संगीत दिग्दर्शकासाठी. तंतुवाद्यांच्या साथीने गायचे दावीदाचे मासकील. हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐका; माझ्या विनवणीकडे दुर्लक्ष करू नका.
२
माझे ऐका आणि मला उत्तर द्या; माझ्या विचारांनी मी त्रस्त आणि व्याकूळ झालो आहे.
३
माझ्या शत्रूंच्या आवाजाने आणि दुष्टांच्या धमक्यांमुळे मी कण्हत आहे, कारण ते माझ्यावर अनर्थ आणतात आणि रागाने माझी निर्भत्सना करतात.
४
माझ्या हृदयात अत्यंत मनोवेदना होत आहेत; मरणाची भीती मला दडपून टाकीत आहे.
५
भीती आणि कंप यांनी मला ग्रस्त केले आहे. अतिभयाने मला ग्रासले आहे.
६
अहाहा, मला कबुतराचे पंख असते तर किती उत्तम झाले असते! दूर उडत जाऊन मी विश्रांती घेतली असती.
७
अतिदूरच्या रानात मी उडून गेलो असतो आणि तिथेच वस्ती केली असती. सेला
८
या तुफानी वारा आणि वादळापासून मी माझ्या आश्रयस्थानी उडून गेलो असतो.
Settings