स्तोत्रसंहिता ११९:१८-४२
१८
तुमच्या नियमशास्त्रातील अद्भुत रम्य गोष्टी पाहण्यासाठी माझे डोळे उघडा.
१९
या पृथ्वीवर मी केवळ एक प्रवासी आहे; तुमच्या आज्ञा माझ्यापासून लपवून ठेऊ नका.
२०
तुमच्या नियमांची सतत लागलेली उत्कंठा मला कासावीस करते.
२१
तुमच्या आज्ञांपासून पथभ्रष्ट झालेल्या शापित आणि गर्विष्ठ लोकांना तुम्ही धमकाविता.
२२
त्यांनी केलेला उपहास व तिरस्कारास माझ्यापासून दूर करा, कारण मी तुमच्या आज्ञा पाळतो.
२३
अधिपती जरी एकत्र बसतात व माझ्याविरुद्ध बोलतात, तरी तुमचा सेवक तुमच्या विधींचे मनन करेल.
२४
तुमचे नियम मला आनंददायी वाटतात; तेच माझे सल्लागार आहेत.
२५
मी पूर्णपणे निरुत्साही होऊन धुळीत पडून आहे; तुम्ही आपल्या वचनानुसार माझ्या जीवनाचे जतन करा.
२६
मी माझ्या मार्गाचे वर्णन केले आणि तुम्ही मला उत्तर दिले; तुमचे नियम मला शिकवा.
२७
तुमच्या शिक्षणाची पद्धत मला समजू द्या, म्हणजे मी तुमच्या अद्भुत कृत्यांचे मनन करेन.
२८
दुःखाने मी हतबल झालो आहे; तुमच्या वचनांद्वारे मला सशक्त करा.
२९
असत्य मार्गापासून मला दूर ठेवा; तुमच्या कृपेनुसार आपल्या विधिनियमांचे मला शिक्षण द्या.
३०
विश्वसनीय मार्गाची मी निवड केली आहे; तुमच्या नियमांवर मी आपले हृदय केंद्रित केले आहे.
३१
याहवेह, मी तुमच्या आज्ञांना चिकटून राहतो, मला लज्जित होऊ देऊ नका.
३२
मी तुम्ही आज्ञापिलेल्या मार्गावर धावत आहे, कारण तुम्ही माझी समज विस्तृत केली आहे.
३३
हे याहवेह, तुमच्या विधींचे मला शिक्षण द्या, जेणेकरून शेवटपर्यंत मी त्याचे पालन करावे.
३४
मला सुबुद्धी द्या, म्हणजे मी तुमचे नियम समजून त्यांचे पूर्ण हृदयाने पालन करत राहीन.
३५
तुमच्या मार्गावर चालण्यास माझे मार्गदर्शन करा, कारण तेच मला आनंद देतात.
३६
मी तुमच्या आज्ञापालनाची आवड धरावी, परंतु स्वार्थाच्या लाभाची नव्हे.
३७
निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी फिरवा; तुमच्या मार्गानुसार माझ्या जीवनाचे जतन करा.
३८
तुमच्या सेवकाला दिलेली अभिवचने पूर्ण करा, म्हणजे तुमचे भय कायम राहील.
३९
लज्जेची भीती माझ्यापासून दूर करा, कारण तुमच्या आज्ञा उत्तम आहेत.
४०
तुमच्या आज्ञापालनास मी किती उत्कंठित आहे! तुमच्या नीतिमत्तेनुसार माझ्या जीवनाचे जतन करा.
४१
हे याहवेह, तुमची अक्षय प्रीती मला प्रगट होऊन तुमच्या अभिवचनानुसार मला तारण प्राप्त होवो;
४२
मग मला टोचून बोलणार्यांना मी उत्तर देईन, कारण तुमच्या अभिवचनांवर मी विश्वास ठेवतो.
Settings