Skip to content
नहेम्याह ९:१५-२५

नहेम्याह ९:१५-२५

१५
ते भुकेले असताना त्यांना स्वर्गातून भाकर दिली आणि तहानलेले असताना खडकातून पाणी दिले; तुम्ही त्यांना आज्ञा दिली की, त्यांनी जावे व जी तुम्ही बाहू उभारून वचनदत्त केली होती, त्या भूमीचा ताबा घ्यावा.
१६
“पण ते, आमचे पूर्वज गर्विष्ठ व दुराग्रही बनले व त्यांनी तुमच्या आज्ञा पाळल्या नाही.
१७
त्यांनी तुमचे ऐकण्याचे नाकारले आणि तुम्ही त्यांच्यामध्ये केलेल्या चमत्कारांची आठवण ठेवली नाही. उलट त्यांनी बंडखोरी केली आणि परत गुलामगिरीत आपल्याला न्यावे म्हणून एक पुढारी नेमला. पण तुम्ही क्षमाशील परमेश्वर आहात, दयाळू आणि कृपाळू, मंदक्रोध व प्रेमाने ओतप्रोत भरलेले आहात. तुम्ही त्यांचा त्याग केला नाही,
१८
जरी त्यांनी वासराची ओतीव मूर्ती तयार केली आणि जाहीर केले, ‘हे आमचे परमेश्वर आहेत; यांनीच आम्हाला इजिप्तमधून बाहेर काढले,’ अथवा जेव्हा त्यांनी भयानक रीतीने ईशनिंदा केली तरीही.
१९
“तुमच्या महान करुणेमुळे रानातच त्यांचा त्याग केला नाही. मेघस्तंभाने दिवसा त्यांना मार्गदर्शन केले आणि अग्निस्तंभाने रात्री प्रकाश देऊन त्यांना वाट दाखविणे थांबविले नाही.
२०
आपला चांगला आत्मा पाठवून त्यांना बोध केला. त्यांच्या मुखासाठी स्वर्गातून तुमचा मान्ना पुरविण्याचे आणि तहान भागविण्यासाठी पाणी देण्याचे तुम्ही थांबविले नाही.
२१
चाळीस वर्षापर्यंत रानात तुम्ही त्यांचे पालनपोषण केले; त्यांना कशाचीही उणीव पडू दिली नाही, त्यांचे कपडे जीर्ण झाले नाहीत की त्यांचे पाय सुजले नाहीत.
२२
“नंतर राज्ये व राष्ट्रे तुम्ही त्यांना दिली आणि दूरवरच्या कानाकोपर्‍यातील सरहद्दीही दिल्या. त्यांनी हेशबोनचा राजा सीहोन व बाशानचा राजा ओगचे देश काबीज केले.
२३
तुम्ही त्यांचे वंशज ताऱ्यागत बहुगुणित केले आणि त्यांच्या पूर्वजांना जा व काबीज करा असे वचन दिलेल्या देशात तुम्ही त्यांना आणले.
२४
त्यांची लेकरे आत गेली व त्यांनी तो प्रदेश ताब्यात घेतला. तुम्ही त्यांच्यापुढे, तिथे राहणारे कनानी लोक नमविले. हे कनानी लोक व त्यांचे राजेसुद्धा त्यांच्या हातात, त्यांना वाटेल तसे वागविण्यासाठी सुपूर्द केले.
२५
त्यांनी तटबंदीची शहरे आणि सुपीक जमिनी काबीज केल्या; सर्व चांगल्या वस्तूंनी भरलेली घरे, खोदलेल्या विहिरी, द्राक्षमळे, जैतुनाचे मळे व विपुल फळझाडे हस्तगत केली. मग ते खाऊन तृप्त व उत्तमरित्या पोषित झाले; आणि तुमच्या महान चांगुलपणाचा त्यांनी आनंद साजरा केला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options