लेवीय १९:३-१८
३
“ ‘तुमच्यातील प्रत्येकाने आपल्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे आणि माझा शब्बाथ पाळलाच पाहिजे. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
४
“ ‘मूर्तीकडे वळू नका आणि आपल्यासाठी ओतीव देव करू नका. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
५
“ ‘जेव्हा तुम्ही याहवेहला शांत्यर्पणे करता, तेव्हा ती अशा प्रकारे अर्पण करा की तुमच्यावतीने मान्य करण्यात येतील.
६
तुम्ही अर्पिलेला यज्ञपशू त्याच दिवशी किंवा दुसर्या दिवशी खावा; पण तिसर्या दिवशी उरलेले जाळूनच टाकले पाहिजे.
७
जर कोणी तिसर्या दिवशी त्यातील काही खाल्ले तर ते अशुद्ध आहे आणि ते स्वीकारले जाणार नाही.
८
जो कोणी ते खाईल तो दोषी ठरेल, कारण ज्यागोष्टी याहवेहला पवित्र आहेत, त्याला त्यांनी अपवित्र केले आहे. अशा व्यक्तीला त्यांच्या लोकांमधून बहिष्कृत करावे.
९
“ ‘तुम्ही पिकांची कापणी कराल, तेव्हा शेताच्या कानाकोपर्यातील पिकांची कापणी करू नये आणि शेतात हंगामानंतर राहिलेला सरवा गोळा करू नये.
१०
तुमच्या द्राक्षमळ्यावर दुसर्यांदा जाऊ नका अथवा पडलेली द्राक्षे गोळा करू नका. गोरगरिबांसाठी आणि परदेशीयांसाठी ती तिथेच राहू द्यावी. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
११
“ ‘तुम्ही चोरी करू नये. “ ‘खोटे बोलू नये. “ ‘एकमेकांना फसवू नये.
१२
“ ‘तुम्ही माझ्या नावाने खोटी शपथ वाहू नये आणि तुमच्या परमेश्वराचे नाव अपवित्र करू नये. मी याहवेह आहे.
१३
“ ‘तुम्ही कोणाला फसवू नये किंवा तुमच्या शेजार्याला लुबाडू नये. “ ‘मजुरांची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नये.
१४
“ ‘तुम्ही बहिर्यांना शाप देऊ नये किंवा आंधळ्याच्या समोर अडखळण ठेवू नये, परंतु तुमच्या परमेश्वराची भीती बाळगावी. मी याहवेह आहे.
१५
“ ‘न्याय देताना अन्याय करू नका; तुम्ही गरिबांमध्ये भेदभाव करू नये, उच्च लोकांच्या आदराचा तुमच्या निर्णयावर परिणाम होऊ नये, तर तुम्ही तुमच्या शेजार्याचा योग्य न्याय करावा.
१६
“ ‘तुमच्या लोकांमध्ये निंदा करीत फिरू नये. “ ‘तुमच्या शेजार्याचा जीव धोक्यात येईल असे काहीही करू नका. मी याहवेह आहे.
१७
“ ‘तुमच्याबरोबर असलेल्या इस्राएली मनुष्याचा तुमच्या अंतःकरणात द्वेष करू नये. तुमच्या शेजार्याला उघडपणे ताकीद द्यावी म्हणजे तुम्ही त्यांच्या पापाचे सहभागी होणार नाही.
१८
“ ‘सूड उगवू नका किंवा तुमच्या लोकांमध्ये कोणाचाही द्वेष करू नका, तर जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करावी. मी याहवेह आहे.
Settings