विलापगीत ३:७-३१
७
त्यांनी माझ्याभोवती भिंत बांधली, म्हणजे मी सुटून जाऊ शकणार नाही; त्यांनी मला अवजड साखळदंडानी जखडले आहे.
८
जरी मी एवढा धावा करतो व मदतीसाठी ओरडतो, तरी ते माझ्या प्रार्थना ऐकत नाहीत.
९
मोठमोठे दगड ठेऊन माझ्या मार्गात बाधा घातली आहे. त्यांनी माझी वाट आडवळणांची केली आहे.
१०
दबा धरून बसलेल्या अस्वलाप्रमाणे, लपून बसलेल्या सिंहाप्रमाणे
११
त्यांनी मला माझ्या वाटेवरून ओढून नेले आणि छिन्नविछिन्न केले आणि मला तसेच असहाय्य टाकून दिले.
१२
त्यांनी आपले धनुष्य ताणून मला आपल्या बाणाचे लक्ष्य बनविले आहे.
१३
आणि त्यांच्या भात्यातील बाणांनी माझे अंतर्याम छेदले आहे.
१४
मी माझ्या लोकांच्या उपहासाचा विषय झालो आहे; ते दिवसभर माझ्या चेष्टेची गीते गातात.
१५
प्रभूने मला कडू दवण्याने भरून टाकले आहे, आणि मला आंब प्यावयास दिली आहे.
१६
त्यांनी माझे दात खड्यांनी पाडले आहेत. त्यांनी मला धुळीत तुडविले आहे.
१७
माझी शांती हिरावून गेली आहे; समृद्धी म्हणजे काय असते हे मी विसरलो आहे.
१८
म्हणून मी म्हणतो, “माझे वैभव निघून गेले आहे व याहवेहकडून काहीही मिळण्याची आशा नष्ट झाली आहे.”
१९
माझी पीडा व भटकंतीची, विषारी वनस्पती व कडू दवणा यांची मला आठवण येते.
२०
ते माझ्या चांगलेच स्मरणात आहे, आणि त्याने माझा आत्मा अत्यंत खिन्न होतो.
२१
तरीपण आशेचा हा एक किरण उरला आहे:
२२
याहवेहच्या महान प्रीतीमुळे आम्ही पूर्णपणे भस्म झालेलो नाही कारण त्यांच्या कृपेचा कधीही ऱ्हास होत नाही.
२३
त्यांची प्रेमदया प्रतिदिवशी नवी होते; तुमची विश्वसनीयता महान आहे.
२४
मी स्वतःस म्हणतो, “याहवेह माझा वाटा आहेत; म्हणूनच मी त्यांची प्रतीक्षा करेन.”
२५
जे याहवेहवर त्यांची आशा ठेवतात, आणि जे त्यांचा शोध घेतात, त्या सर्वांसाठी ते भले आहेत.
२६
याहवेहच्या तारणाची शांतपणे वाट पाहणे हितकारक आहे.
२७
मनुष्याने त्याच्या तारुण्यात जू वाहणे त्याच्या हितासाठी आहे.
२८
कारण ते याहवेहनेच त्याच्यावर लादले आहे म्हणून त्याने एकांतात शांत बसावे.
२९
त्याला त्याचे मुख धुळीत पुरू दे— तरी आशा कायम असेल.
३०
जे त्याला चपराक मारतात, त्यांच्यापुढे त्याने दुसरा गालही करावा, आणि तो सर्व अपमानाने भरून जाऊ दे.
३१
कारण प्रभू कोणाचाही कायमचा त्याग करत नाहीत.
Settings