यहोशुआ १५:१-१२
१
यहूदाह गोत्रास त्यांच्या कुटुंबानुसार चिठ्ठ्या टाकून देण्यात आलेला प्रदेश एदोमाच्या सीमेपर्यंत आणि सीनच्या वाळवंटातील दक्षिणेच्या सीमेपर्यंत पसरला होता.
२
त्यांची दक्षिण सीमा मृत समुद्राच्या दक्षिणेस असलेल्या शेवटच्या खाडीपासून सुरू झाली,
३
अक्राब्बीमच्या चढावाच्या दक्षिणेस असलेल्या मार्गाने सीन रानाच्या कडेने जाऊन दक्षिणेस कादेश-बरनेआपर्यंत. नंतर ती हेस्रोनच्या पुढे अद्दारपर्यंत आणि कारकाला वळण घेते.
४
नंतर पुढे जाऊन ती आजमोनच्या बाजूने इजिप्तच्या ओढ्यापर्यंत जाऊन, त्या ओढ्याच्या कडेने ती भूमध्य समुद्रापर्यंत गेली होती. ही त्यांची दक्षिणी सीमा आहे.
५
त्यांची पूर्वेकडील सीमा यार्देन नदीच्या मुखाकडे असलेल्या मृत समुद्रापर्यंत होती. त्यांच्या उत्तरेकडील सीमेची सुरुवात यार्देनेच्या मुखाशी असलेल्या खाडीपासून झाली,
६
व पुढे बेथ-होगलाहपर्यंत चढून बेथ-अराबाहच्या उत्तरेकडे रऊबेनाचा पुत्र बोहनच्या खडकापर्यंत गेली.
७
तिथून ती सीमा आखोर खोर्यापासून दबीरपर्यंत जाऊन गिलगालच्या उत्तरेकडे वळली. हे गिलगाल खोर्याच्या दक्षिण बाजूस असलेल्या अदुमिम्माच्या चढावांच्या समोरील बाजूस आहे. तिथून त्या सीमेचा विस्तार एन-शेमेशच्या झर्यांपासून एन-रोगेलपर्यंत होता.
८
त्यानंतर ती सीमा हिन्नोमाच्या खोर्यातून जाऊन यबूसी नगराच्या (म्हणजे यरुशलेम) दक्षिणेकडील बाजूने गेली. पुढे ती सीमा पश्चिमेकडे हिन्नोमाच्या खोर्यासमोर आणि रेफाईम खोर्याच्या उत्तरेकडील टोकास असलेल्या पर्वताच्या माथ्यावर जाऊन पोहोचली.
९
तिथून ती सीमा त्या डोंगराच्या माथ्यापासून नेफतोआहच्या झर्यापर्यंत आणि तिथून एफ्रोन डोंगरातील नगरांवरून निघून बालाह म्हणजेच किर्याथ-यआरीमपर्यंत पोहोचते.
१०
तिथून ती बालाहाच्या पश्चिमेस वळसा घेऊन सेईर पर्वताकडे गेली आणि यआरीम म्हणजेच कसालोन डोंगराच्या उत्तरेस जाऊन बेथ-शेमेश इथे उतरून तिम्नाहास जाऊन पोहोचते.
११
तिथून ती एक्रोनच्या उत्तरेकडून शिक्रोनपर्यंत गेली व बालाह पर्वतावरून यबनेलास जाऊन पोहोचली. सीमेचा शेवट भूमध्य समुद्राजवळ झाला.
१२
भूमध्य समुद्राचा किनारा ही पश्चिमेची सीमा होती.
Settings