इय्योब ५:१७-२७
१७
“परमेश्वर ज्याची सुधारणा करतात तो धन्य; म्हणून सर्वसमर्थाचे शासन तू तुच्छ मानू नको.
१८
कारण ते जखम करतात आणि पट्टीसुध्दा तेच बांधतात; ते दुखापत करतात, परंतु त्यांचाच हात आरोग्य देतो.
१९
सहा संकटातून ते तुला वाचवतील; आणि सातव्यात तुम्हाला कोणतेही अनिष्ट स्पर्श करणार नाही.
२०
दुष्काळामध्ये परमेश्वर तुला मरणापासून वाचवतील; युद्धकाळात ते तुला तलवारीच्या प्रहारापासून वाचवतील.
२१
जिभेच्या तडाख्यापासून तू सुरक्षित राहशील, विनाश आल्यावर तुला भय बाळगण्याचे नाही.
२२
विनाश व दुष्काळ यांना तू हसशील, आणि हिंस्त्र पशूंचे भय तुला वाटणार नाही.
२३
कारण शेतातील पाषाणांशी तुझा करार होईल, आणि वनपशू तुझ्याशी शांतीने राहतील.
२४
तुझा तंबू सुरक्षित आहे हे तू जाणशील; तपास करशील तेव्हा तुझ्या मालमत्तेतील काहीही गहाळ झालेले तुला आढळणार नाही.
२५
तुला बरीच संतती झाली आहे हे तुला समजेल, आणि तुझे वंशज पृथ्वीवरील गवतासारखे होतील.
२६
जशा हंगामाच्या वेळी धान्याच्या पेंढ्या गोळा करण्यात येतात, तसेच तू कबरेत जाईपर्यंत तुझ्या शौर्याचा ऱ्हास होणार नाही.
२७
“हे सर्व अगदी सत्य आहे आणि याची आम्ही परीक्षा केली आहे. म्हणून माझा हा सल्ला ऐकून त्याचा अंगीकार करून घे.”
Settings