उत्पत्ती ४०:८-१९
८
त्यांनी उत्तर दिले, “काल रात्री आम्हा दोघांनाही स्वप्न पडले, पण आम्हाला त्यांचा अर्थ सांगणारा येथे कोणीच नाही.” यावर योसेफ म्हणाला, “स्वप्नांचा उलगडा करून सांगणे हे परमेश्वराकडूनच असते ना? स्वप्नात तुम्ही काय पाहिले ते सांगा.”
९
मुख्य प्यालेबरदारने आपले स्वप्न योसेफाला सांगितले. तो म्हणाला, “स्वप्नात मी एक द्राक्षवेल पाहिली.
१०
तिला तीन फांद्या होत्या. त्यांना कळ्या व फुले आली आणि लवकरच त्याला पिकलेल्या द्राक्षांचे घोसही लागले.
११
माझ्या हातात फारोहचा प्याला होता, त्यात ती द्राक्षे पिळून मी रस काढला आणि तो प्याला फारोह राजाला प्यावयास दिला.”
१२
तेव्हा योसेफ म्हणाला, “या स्वप्नाचा अर्थ असा: तीन फांद्या म्हणजे तीन दिवस.
१३
या तीन दिवसात फारोह तुला तुरुंगातून सोडून देईल आणि तू स्वतः परत राजाच्या हाती प्याला देशील, जसा तू आधी प्यालेबरदार म्हणून देत होता.
१४
पण जेव्हा तुझ्याबरोबर सर्वकाही ठीक होईल, तेव्हा माझी आठवण ठेव आणि माझ्यावर कृपा दाखव, फारोहजवळ माझा उल्लेख कर आणि मला या तुरुंगातून बाहेर काढ.
१५
कारण मला इब्री लोकांच्या देशातून येथे पळवून आणण्यात आले आणि अंधारकोठडीची शिक्षा मला मिळावी, असे मी काही केले नाही.”
१६
त्याच्या स्वप्नाचे उत्तर चांगले निघाले आहे हे पाहून, रोटी भाजणारा प्रमुख योसेफाला म्हणाला, “मला देखील एक स्वप्न पडले आहे: मला माझ्या डोक्यावर रोट्यांच्या तीन टोपल्या दिसल्या.
१७
सर्वात वरच्या टोपलीमध्ये फारोहसाठी भटारखान्यातील सर्वप्रकारचे उत्कृष्ट प्रतीचे खाद्यपदार्थ होते; परंतु पक्षी येऊन माझ्या डोक्यावरील टोपलीतून ते पदार्थ खाऊ लागले.”
१८
योसेफाने अर्थ सांगताना म्हटले, “या तीन टोपल्या म्हणजे तीन दिवस होत.
१९
आजपासून तीन दिवसांनी फारोह तुझा शिरच्छेद करेल व तुझा मृतदेह सुळावर ठेवेल आणि पक्षी येऊन तुझे मांस टोचून खातील.”
Settings