Skip to content
यहेज्केल ४५:९-२५

यहेज्केल ४५:९-२५

९
“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात, अहो इस्राएलाच्या राजपुत्रांनो, तुम्ही फार पुढे गेला आहात! तुमचा आतंक आणि अत्याचार टाकून द्या आणि जे नीतिपूर्ण व योग्य ते करा. माझ्या लोकांचे वतन काढून घेण्याचे थांबवा, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
१०
तुम्ही अचूक काटा, अचूक एफाह आणि अचूक बथ वापरावा.
११
एफाह आणि बथ एकाच मापाचे असावे, म्हणजे बथमध्ये होमेरचा दहावा भाग व एफाहमध्ये होमेरचा दहावा भाग असावा; होमेर हे दोन्ही मापांसाठी एकच माप असावे.
१२
शेकेलमध्ये वीस गेराह असावे. वीस शेकेल आणि पंचवीस शेकेल आणि पंधरा शेकेल हे एक मीना समान आहेत.
१३
“ ‘तुम्ही अर्पण करावी ती विशेष भेट ही आहे: गव्हाच्या प्रत्येक होमेरातून एक एफाहचा सहावा भाग आणि जवाच्या प्रत्येक होमेरातून एक एफाहचा सहावा भाग.
१४
बथने मापलेले जैतुनाच्या तेलाचा नेमलेला भाग, जो प्रत्येक कोर मधून एक बथचा दहावा भाग आहे (ज्यात दहा बथ किंवा एक होमेर मावते, कारण दहा बथ हे एका होमेरसमान आहेत).
१५
इस्राएलमधील पुष्कळ पाणी असलेल्या कुरणातील कळपातून दोनशे मेंढरांमागे एक मेंढरू द्यावे. याचा उपयोग लोकांचे प्रायश्चित करावे म्हणून धान्यार्पणे, होमार्पणे आणि शांत्यर्पणे यासाठी केला जावा, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
१६
देशातील सर्व लोकांनी ही विशेष अर्पणे इस्राएलच्या राजपुत्राला देणे आवश्यक आहे.
१७
हे राजपुत्राचे कर्तव्य असावे की त्याने इस्राएलच्या सर्व नेमलेल्या सणांच्या वेळी; म्हणजेच अमावस्या आणि शब्बाथाच्या वेळी होमार्पणे, धान्यार्पणे आणि पेयार्पणे आणावी. त्याने पापार्पणे, धान्यार्पणे, होमार्पणे आणि शांत्यर्पणे आणून इस्राएली लोकांसाठी प्रायश्चित करावे.
१८
“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही एक निर्दोष गोर्‍हा घेऊन पवित्रस्थान शुद्ध करावे.
१९
याजकाने पापार्पणातील काही रक्त घेऊन मंदिराच्या द्वार पट्टीवर, वेदीच्या वरील बैठकीच्या चार कोपर्‍यांना आणि आतील अंगणाच्या द्वार पाट्यांवर लावावे.
२०
त्याचप्रमाणे सातव्या दिवशी तुम्ही तसेच करावे जर कोणी नकळत भोळेपणाने किंवा अज्ञानात पाप केले; तर मंदिरासाठी तुम्ही ते प्रायश्चित करावे.
२१
“ ‘पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी तुम्ही वल्हांडण सण पाळावा, तो सण सात दिवसांचा असावा, त्यात तुम्ही खमीर नसलेली भाकर खावी.
२२
त्या दिवशी राजपुत्राने स्वतःसाठी व देशातील सर्व लोकांच्या पापार्पणासाठी एक गोर्‍हा द्यावा.
२३
सणाच्या सात दिवसाच्या दरम्यान दररोज त्याने सात निर्दोष गोर्‍हे व सात एडके होमार्पण म्हणून याहवेहसमोर आणावे, त्याचप्रमाणे पापार्पणासाठी एक बोकड आणावे.
२४
धान्यार्पण म्हणून त्याने प्रत्येक गोर्‍ह्याबरोबर एक एफाह व एका मेंढ्याबरोबर एक एफाह द्यावा, त्याचबरोबर एका एफाहमागे एक हीन जैतुनाचे तेल आणावे.
२५
“ ‘त्याचप्रमाणे सात दिवसांच्या सणाच्या दरम्यान, ज्याची सुरुवात सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी होते, त्याने पापार्पणे, होमार्पणे व धान्यार्पणे आणि तेल आणावे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options