यहेज्केल ३९:११-२०
११
“ ‘त्या दिवशी मी गोगला इस्राएलमध्ये मृतकांना पुरण्याचे एक ठिकाण देईन, जे समुद्राच्या पूर्वेकडे प्रवास करणार्यांच्या खोर्यामध्ये आहे. त्यामुळे प्रवाशांची वाट अडविली जाईल, कारण गोग आणि त्याचे सर्व सैन्य तिथे पुरले जातील. म्हणून त्याला हामोन-गोगचे खोरे म्हटले जाईल.
१२
“ ‘देश शुद्ध करण्यासाठी इस्राएली लोक त्या मृतकांना सात महिने पूरत राहतील.
१३
देशातील सर्व लोक त्यांना पुरतील आणि मी माझे वैभव प्रकट करेन तो दिवस त्यांच्यासाठी अविस्मरणीय असेल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
१४
देश सातत्याने शुद्ध करण्यासाठी लोकांना कामावर लावले जाईल. ते अजून इतर लोकांबरोबर देशभर पसरतील, जमिनीवर जे मृतदेह पडलेले असतील त्यांना ते पुरतील. “ ‘सात महिने संपल्यावर ते अजून बारीक शोध करतील.
१५
जेव्हा ते देशभर फिरतील, तेव्हा ज्या कोणाला मानवी हाड सापडेल, तिथे ते चिन्ह करून ठेवतील आणि कबर खोदणारे त्यांना हामोन गोगच्या खोर्यात,
१६
जे हामोनाह नगरात आहे तिथे पुरेपर्यंत असे होत जाईल. अशाप्रकारे ते देशाला शुद्ध करतील.’
१७
“मानवपुत्रा, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: प्रत्येक प्रकारच्या पक्ष्यांना आणि हिंस्र पशूंना बोलावून सांग: ‘एकवट व्हा आणि जो यज्ञ, एक मोठा यज्ञ मी इस्राएलच्या पर्वतांवर तयार करीत आहे त्यासाठी चहूकडून एकत्र या. तिथे तुम्ही मांस खाल व रक्त प्याल.
१८
तुम्ही बलवान पुरुषांचे मांस खाल व पृथ्वीच्या राजपुत्रांचे रक्त प्याल, जणू ते बाशानातील पोसलेले सर्व प्राणी म्हणजेच मेंढे व कोकरे, बोकडे व वासरे आहेत.
१९
जो यज्ञ मी तुम्हासाठी तयार करीत आहे, त्यात तृप्ती होईपर्यंत तुम्ही चरबी खाल व पिऊन मस्त होईपर्यंत रक्त प्याल.
२०
माझ्या मेजावर बसून घोडे व स्वार, बलवान पुरुष आणि सर्वप्रकारच्या सैनिकांना खाऊन तुम्ही तृप्त व्हाल,’ असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
Settings