Skip to content
यहेज्केल ३२:१-१६

पहिले शोकगीत: फारोवर देवाचा न्याय

यहेज्केल ३२:१-१६
बाराव्या वर्षी, बाराव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
“मानवपुत्रा, इजिप्तचा राजा फारोहसाठी विलाप कर आणि त्याला सांग: “ ‘राष्ट्रांमध्ये तू सिंहासारखा आहेस; तू समुद्रातील श्वापदासारखा आहेस, तुझ्या झर्‍यांमध्ये उसळ्या मारल्यास, आपल्या पायांनी पाणी घुसळले आणि झर्‍यात चिखल केलास.
“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘लोकांच्या मोठ्या जमावाद्वारे माझे जाळे मी तुझ्यावर टाकेन, आणि ते तुला माझ्या जाळ्यात ओढून घेतील.
मी तुला जमिनीवर फेकून देईन आणि उघड्या मैदानात तुला टाकून देईन. आकाशातील सर्व पक्ष्यांना मी तुझ्यावर वसू देईन आणि जंगलातील सर्व प्राणी तुला लचके मारून खातील.
मी तुझे मांस डोंगरांवर पसरवीन आणि तुझ्या अवशेषाने खोरे भरेन.
तुझ्या वाहत्या रक्ताने अगदी डोंगरांपर्यंत मी देश भिजवेन आणि तुझ्या मांसाने ओहोळे भरतील.
जेव्हा मी तुझा नाश करेन, मी आकाशे झाकीन आणि त्यातील तारे अंधुक करेन; सूर्याला मी ढगांनी आच्छादेन आणि चंद्र आपला प्रकाश देणार नाही.
आकाशातील प्रत्येक चमकणारी ज्योत मी तुझ्यावर अंधार अशी करेन; मी तुझ्या देशावर अंधकार आणेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
जेव्हा जे देश व जी राष्ट्रे तुला ओळखत नाहीत त्यात मी तुझा नाश करेन, तेव्हा मी पुष्कळ लोकांचे हृदय कष्टी करेन.
१०
अनेक लोक तुझ्याकडे पाहून भयचकित होतील असे मी करेन, जेव्हा त्यांच्यासमोर मी माझी तलवार चालवेन तेव्हा त्यांचे राजे तुझ्यामुळे भयाने कापतील, तुझे पतन होईल त्या दिवशी सर्वजण आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी भयभीत होतील.
११
“ ‘कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘बाबेलच्या राजाची तलवार तुझ्याविरुद्ध येईल.
१२
राष्ट्रांतील जे सर्वात क्रूर अशा बलवान मनुष्यांच्या तलवारीने मी तुझे सैन्य पाडून टाकीन. इजिप्तचा अहंकार ते मोडून टाकतील, आणि तिच्या सर्व सैन्यांचा नाश होईल.
१३
पाण्याच्या प्रवाहांजवळ असणार्‍या तिच्या सर्व जनावरांचा मी नाश करेन. ती पुन्हा कोणत्याही मनुष्याच्या पायांनी तुडविली जाणार नाही ना पशूंच्या खुरांनी तिथे चिखल होणार.
१४
तेव्हा मी तिचे पाणी स्थिर करेन आणि तिचे प्रवाह तेलाप्रमाणे वाहतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
१५
जेव्हा मी इजिप्त ओसाड करेन आणि देशात असलेले सर्वकाही काढून घेईन, जेव्हा तिथे वसत असलेल्या सर्वांचा मी नाश करेन, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’
१६
“तिच्यासाठी जे विलापगीत ते गातील ते हेच. राष्ट्रांच्या कन्या हे गातील; इजिप्त व तिच्या सर्व सैन्यासाठी त्या हे गातील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options