Skip to content
यहेज्केल १७:११-२४

यहेज्केल १७:११-२४

११
तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
१२
“बंडखोर लोकांना सांग, ‘या गोष्टींचा अर्थ तुम्हाला माहीत नाही काय?’ त्यांना सांग: ‘बाबेलचा राजा यरुशलेमात गेला आणि तिचा राजा व सरदारांना घेऊन त्याच्याबरोबर परत बाबिलोनात आणले.
१३
मग त्याने राजघराण्यातील एक सदस्य घेतला व त्याच्याशी करार केला आणि त्याला शपथेत बांधले. त्याने देशातील प्रमुख पुरुषांना देखील नेले,
१४
म्हणजे राज्याचा पडाव होऊन ते पुन्हा उठू शकणार नाही आणि केवळ त्याचा करार पाळूनच वाचेल.
१५
परंतु राजाने त्याच्याविरुद्ध बंड केले आणि आपले घोडे व मोठे सैन्य आणण्यासाठी इजिप्तला त्याचे राजदूत पाठवले. तो यशस्वी होईल काय? अशा प्रकारचे काम करणारा वाचेल काय? करार तोडला तरी वाचेल काय?
१६
“ ‘सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जिवाची शपथ, तो बाबेलमध्ये, ज्याने त्याला राजासनावर बसविले, ज्याची शपथ त्याने तुच्छ मानली आणि ज्याचा करार त्याने मोडला, त्याच राजाच्या देशात तो मरेल.
१७
पुष्कळ जिवांचा नाश करण्यासाठी जेव्हा मोर्चे बांधतील व बुरूज उभारतील, तेव्हा फारोह त्याच्या बलवान सैन्य व मोठ्या जमावाच्या मदतीने त्या युद्धात त्याचे साहाय्य करू शकणार नाही.
१८
त्याने करार मोडून शपथ तुच्छ मानली आहे. कारण त्याने हातात हात देऊन प्रतिज्ञा केली आणि तरीही त्याने या सर्व गोष्टी केल्या, त्याचा निभाव होणार नाही.
१९
“ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्या जिवाची शपथ, माझी शपथ तुच्छ मानली व माझा करार मोडला, म्हणून मी त्याचा न्याय करेन.
२०
त्याच्यासाठी मी माझे जाळे पसरवीन आणि तो त्या पाशात पकडला जाईल. मी त्याला बाबेलमध्ये आणेन आणि तिथे त्याच्यावर न्याय आणेन कारण तो माझ्याशी अविश्वासू राहिला.
२१
त्याचे सर्व उत्तम सैन्य तलवारीने पडेल आणि त्यातून जे वाचतील ते वार्‍याच्या दिशेने पसरतील. तेव्हा तुम्ही जाणाल की मी याहवेह हे बोललो आहे.
२२
“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी एका गंधसरूचा सर्वात उंच शेंडा घेऊन तो लावेन; मी त्याचा अगदी वरचा लवचिक शेंडा तोडेन आणि तो सर्वात उंच व मोठ्या पर्वतावर लावेन.
२३
इस्राएलच्या उंच पर्वतावर मी तो लावेन; त्याला फांद्या फुटतील व ते फळ देईल आणि ते वैभवी गंधसरू बनेल. प्रत्येक प्रकारचे पक्षी त्यात घरटे बनवतील; त्यांना त्या गंधसरूच्या फांद्यांच्या छायेत आसरा मिळेल.
२४
रानातील सर्व झाडे जाणतील की मी याहवेह उंच झाडांना वाकवितो आणि वाकलेल्या झाडांना उंच वाढवतो. हिरव्या झाडांना मी वाळवितो आणि वाळलेल्या झाडांना भरभराटीस आणतो. “ ‘मी याहवेह हे बोललो आहे आणि मी हे करणारच.’ ”

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options