Skip to content
यहेज्केल १७:१-१०

यहेज्केल १७:१-१०

याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
“हे मानवपुत्रा, एक रूपक घे आणि ते दाखला म्हणून इस्राएलच्या लोकांना सांग.
त्यांना म्हण, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्याचे पंख शक्तिशाली आहेत, लांब पिसांचा व निरनिराळ्या रंगाचा पिसारा असलेला एक गरुड लबानोनमध्ये आला व त्याने गंधसरूच्या टोकावरील फांदी पकडली,
त्याने त्यावरील अगदी वरचा कोंब तोडला, तो व्यापार्‍यांच्या देशात नेला आणि तिथे विक्रेत्यांच्या शहरात लावला.
“ ‘त्याने देशातील एक रोप घेतले आणि ते सुपीक भूमीत लावले. त्याने ते वाळुंजीप्रमाणे भरपूर पाण्याजवळ लावले,
आणि ते फुटले, पसरट व कमी उंचीची वाढून द्राक्षवेल झाली. तिच्या फांद्या त्या गरुडाच्या दिशेने वळल्या होत्या, परंतु तिची मुळे तिच्याच खाली होती. ती एक द्राक्षवेल झाली आणि तिला पानांनी भरलेल्या फांद्या आल्या.
“ ‘परंतु अजून एक मोठा गरुड आला, ज्याचे शक्तिशाली पंख आणि भरलेला पिसारा होता. द्राक्षवेलीने आता आपली मुळे ती जिथे लावली होती तिथून त्या गरुडाकडे पसरविली आणि पाण्यासाठी आपल्या फांद्या त्याच्याकडे लांब केल्या.
त्या द्राक्षवेलीला पाने आणि फळ यावे व ती एक उत्कृष्ट द्राक्षवेल व्हावी म्हणून भरपूर पाणी असलेल्या चांगल्या भूमीत ती लावली गेली होती.’
“त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तिची भरभराट होईल काय? ती वाळून जावी म्हणून तिचे फळ काढून घेऊन तिला मुळापासून उपटले जाईल काय? तिची सर्व नवीन पालवी वाळून जाईल. तिला समूळ उपटण्यासाठी ना मजबूत हात लागणार ना पुष्कळ लोकांची गरज लागणार.
१०
तिला लावले तर आहे, पण तिची भरभराट होईल काय? पूर्वेकडील वारा तिला लागला म्हणजे ती पूर्णपणे वाळून—ज्या ठिकाणी वाढली त्याच ठिकाणी ती वाळणार नाही काय?’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options