यहेज्केल १६:१५-२२
१५
“ ‘परंतु तू आपल्याच सौंदर्यावर भरवसा केला आणि वेश्या होण्यास आपल्या सौंदर्याचा उपयोग केला. जे कोणी तुझ्या वाटेने गेले त्यांना तुझ्या सौंदर्याने तू भुरळ घातली आणि तुझे सौंदर्य त्याचे झाले.
१६
आपली काही वस्त्रे घेऊन त्यांची भडक उच्च पूजास्थाने तू बनविली, तिथे तू आपला वेश्याव्यवसाय चालू ठेवला. तू त्याच्याकडे गेलीस आणि त्याने तुझ्या सौंदर्यावर कब्जा केला.
१७
मी तुला दिलेले उत्तम दागिने तू घेतले, दागिने जे माझ्या सोन्याचांदीचे बनले होते, ते घेऊन तू त्याच्या पुरुषमूर्ती बनविल्या आणि त्यांच्याशी वेश्यावृत्ती करू लागली.
१८
तू आपल्या नक्षीदार कापडाने त्यांना झाकले आणि मी तुला दिलेले तेल व अत्तर त्यांना अर्पण केले.
१९
मी तुला दिलेले भोजन; म्हणजेच सपीठ, जैतुनाचे तेल आणि मध, जे मी तुला खायला दिले; ते तू सुवासिक धूप म्हणून त्यांना अर्पण केले. हे असेच घडले, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
२०
“ ‘आणि ज्यांना माझ्यापासून जन्म दिला ते आपले पुत्र व कन्यांना तू मूर्तींना अन्न म्हणून अर्पण केले. तुझी वेश्यावृत्ती पुरेशी नव्हती काय?
२१
माझ्या लेकरांचा तू वध केला आणि मूर्तींना यज्ञ केला.
२२
तुझी सर्व अमंगळ कृत्ये आणि तुझी वेश्यावृत्ती यामध्ये तुझे तारुण्यातील दिवस, जेव्हा तू नग्न व उघडी, तुझ्या रक्तात लोळत होती त्याची आठवण तुला राहिली नाही.
Settings