उपदेशक ९:१-६
१
मी या सर्वांवर मनन केले आणि हा निष्कर्ष काढला की नीतिमान व सुज्ञ आणि ते जे काही करतात ते सर्व परमेश्वराच्या हाती आहे, परंतु त्याच्यासाठी पुढे प्रेम किंवा द्वेष यापैकी काय ठेवले आहे हे कोणा मनुष्याला माहीत नसते.
२
सर्वांची नियती एकच आहे—नीतिमान आणि दुष्ट, चांगला आणि वाईट, शुद्ध आणि अशुद्ध, जे यज्ञार्पण करतात व जे करीत नाहीत. जसे चांगल्या व्यक्तीबरोबर, तसेच पापी व्यक्तीबरोबर; जसे शपथ घेणार्यांशी, तसेच जे ती शपथ घ्यायला घाबरतात त्यांच्याशी.
३
सूर्याखाली घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीत हे वाईट आहे: एकसमान नियती सर्वांवर मात करते. शिवाय, लोकांची अंतःकरणे दुष्टाईने भरलेली आहेत आणि जिवंत असताना त्यांच्या अंतःकरणात वेडेपणा आहे आणि नंतर ते मृतांमध्ये सामील होतात.
४
जिवंत लोकांमध्ये असलेल्या प्रत्येकाला ही आशा आहे—जिवंत कुत्रा सुद्धा मृत सिंहांपेक्षा बरा!
५
जिवंतांना आपण मरणार हे माहीत असते, पण मेलेल्यांना काहीच माहीत नसते; त्यांना पुढे काही मोबदला नाही आणि त्यांच्या नावाचे सुद्धा स्मरण नाही.
६
त्यांचे प्रेम, त्यांचा द्वेष आणि त्यांचा हेवा हे सर्व फार पूर्वीच नाहीसे झाले आहे; सूर्याखाली घडत असलेल्या कोणत्याही गोष्टीत पुन्हा त्यांचा वाटा नसेल.
Settings