अनुवाद २८:४४-६८
४४
ते तुम्हाला उसने देतील, पण तुम्ही त्यांना उसने देऊ शकणार नाही. ते मस्तक होतील आणि तुम्ही शेपूट व्हाल.
४५
हे सर्व शाप तुमच्यावर येतील. ते तुमचा नाश होईपर्यंत पाठपुरावा करतील आणि तुम्हाला गाठतील, कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले नाही व ज्या आज्ञा आणि विधी त्यांनी तुम्हाला दिले त्याचे पालन करण्याचे नाकारले.
४६
ही अरिष्टे सदैव तुमच्यावर व तुमच्या संततीवर चिन्ह आणि चमत्कार असे होतील.
४७
कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराची समृद्धीच्या काळात आनंदाने आणि हर्षाने सेवा केली नाही,
४८
म्हणून तुम्ही याहवेहने पाठविलेल्या तुमच्या शत्रूंचे गुलाम व्हाल आणि तुम्ही भुकेले, तहानलेले, नग्न आणि अत्यंत गरीब असे व्हाल आणि ते तुमचा नाश करेपर्यंत तुमच्या मानेवर लोखंडी जू ठेवण्यात येईल.
४९
याहवेह तुमच्यावर दुरून, पृथ्वीच्या सीमेवरून एक राष्ट्र पाठवतील, ते गरुडाप्रमाणे झेप घेऊन तुमच्यावर तुटून पडतील, ते असे राष्ट्र असेल ज्यांची भाषा तुम्हाला समजणार नाही,
५०
ते क्रूर चेहर्याचे राष्ट्र असेल, जे तुमच्यातील वृद्धांना आदर देणार नाहीत किंवा तरुणांना दयामाया दाखविणार नाहीत.
५१
तुमचा नाश होईपर्यंत ते तुमच्या गुराचे वत्स व तुमच्या भूमीचा उपज खाऊन टाकतील. तुमचे धान्य, नवीन द्राक्षारस, जैतुनाचे तेल, वासरे आणि कोकरे ही सर्व नाहीशी करून तुमचा पूर्णपणे नाश करतील.
५२
ते राष्ट्र तुमच्या नगरांना वेढा घालेल आणि तुमचे सर्व उंच व मजबूत तट, ज्यावर तुमची भिस्त आहे, ते पाडून टाकतील. याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला दिलेल्या देशातील सर्व शहरांना ते वेढा घालतील.
५३
तुमच्या शत्रूंनी वेढा दिल्यामुळे आणि त्यांच्या छळामुळे, तुम्ही तुमच्या पोटचे फळ म्हणजे तुमचे पुत्र व कन्या देखील तुम्ही खाऊन टाकाल, जे याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला दिले आहे.
५४
तुमच्यातील अत्यंत कोमलहृदयी व सुसंस्कृत पुरुषाला देखील आपला भाऊ, आपली प्राणप्रिय पत्नी आणि जगून वाचून राहिलेल्या मुलांवरही दयामाया येणार नाही,
५५
आणि तो त्याच्या मुलांचे जे मांस खाईल त्याचे मांस तो त्यापैकी कोणालाही देणार नाही. कारण तुमच्या शहरांना वेढा पडल्यामुळे त्याच्याजवळ काहीच शिल्लक राहणार नाही.
५६
ऐश्वर्यसंपन्न असल्यामुळे जिने आपला तळवाही कधी जमिनीला लावला नाही अशी घरंदाज व कोमलहृदयी पत्नी इतकी कठोरहृदयी बनेल की आपला प्राणप्रिय पती, पुत्र किंवा कन्या यांना ती आपल्या अन्नाचे वाटेकरी होऊ देणार नाही,
५७
आपल्याच पोटचा गर्भ व आपल्याच पोटची मुले स्वतःलाच गुप्तपणे खाता यावी म्हणून ती लपवून ठेवील. अशाप्रकारे या वेढ्याच्या काळातील भूक खूप भयानक असेल आणि तुमच्या शत्रूकडून तुम्हाला तुमच्याच वेशींच्या आत भयंकर संकट व यातना भोगाव्या लागतील.
५८
या पुस्तकात नमूद केलेली नियमशास्त्राची वचने तुम्ही प्रामाणिकपणे आचरणात आणली नाही आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या अद्भुत आणि भयावह नावाचा मान तुम्ही राखला नाही,
५९
तर याहवेह तुमच्यावर व तुमच्या वंशजांवर असाध्य रोग आणि कधीही न थांबणारे भयंकर साथीचे रोग पाठवतील.
६०
ज्या रोगांना तुम्ही भिता, असे इजिप्तमधील सर्व रोग तुमच्यावर आणतील आणि ती तुम्हाला लागून राहतील.
६१
तुमचा नाश होईपर्यंत याहवेह तुम्हावर प्रत्येक आजार आणि सर्व साथींचे रोग आणि या नियमशास्त्र ग्रंथात ज्यांचा उल्लेख नाही, असे सर्व रोग तुम्हावर आणतील.
६२
तुम्ही आकाशातील तार्यांप्रमाणे अगणित असला, तरी अगदीच थोडके उराल, कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे आज्ञापालन केले नाही.
६३
तुमची भरभराट करण्यात व तुम्हाला बहुगुणित करण्यात जसा याहवेहला आनंद वाटला, तसाच आनंद त्यांना तुमचा नाश व नायनाट करण्यातही वाटेल. जो देश तुम्ही ताब्यात घेण्यास जात आहात, त्या देशातून तुमचे उच्चाटन करण्यात येईल.
६४
पृथ्वीच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत असलेल्या निरनिराळ्या राष्ट्रांमध्ये याहवेह तुमची पांगापांग करतील. तिथे तुम्ही किंवा तुमच्या पूर्वजांनी ज्यांची कधीही उपासना केली नाही—अशा लाकडाच्या आणि दगडाच्या दैवतांची तुम्ही उपासना कराल.
६५
त्या राष्ट्रांमध्ये तुम्हाला स्वास्थ्य मिळणार नाही, तुमच्या पायांना विसावा मिळणार नाही, तिथे तुमची हृदये थरथर कापत राहतील, तुमचे डोळे म्लान होतील व तुमचा जीव झुरणीस लागेल, असे याहवेह करतील.
६६
तुम्ही सदैव संशयात जगाल, रात्रंदिवस तुम्ही भीतीने ग्रस्त राहाल, तुमच्या जीवनाची काहीच खात्री राहणार नाही.
६७
तुमची अंतःकरणे भयग्रस्त झाल्यामुळे सारखी धडधडत राहतील, त्यामुळे सकाळी तुम्ही म्हणाल, “अहा, आता रात्र असती, तर किती बरे झाले असते!” आणि संध्याकाळी तुम्ही म्हणाल, “अहा, आता सकाळ असती तर किती बरे झाले असते!”
६८
जो प्रवास तुम्ही कधीही करणार नाही असे याहवेह म्हणाले होते, तोच प्रवास याहवेह तुम्हाला करावयाला लावतील आणि जहाजातून मी तुम्हाला पुन्हा इजिप्त देशामध्ये पाठवेन. मग तिथे तुमच्या शत्रूंनी तुम्हाला पुरुष व स्त्री गुलाम म्हणून विकत घ्यावे यासाठी तुम्ही स्वतःला देऊ कराल, परंतु तुम्हाला कोणाही विकत घेणार नाही.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings