Skip to content
अनुवाद १५:१२-१८

इब्री दासांची मुक्तता

अनुवाद १५:१२-१८
१२
जर तुमच्यापैकी कोणी—इब्री पुरुष किंवा इब्री स्त्री—दास म्हणून स्वतःला विकले आणि सहा वर्षे त्यांनी तुमची सेवा केल्यानंतर सातव्या वर्षी त्यांना मुक्त करावे.
१३
आणि ज्यावेळी तुम्ही त्यांना मुक्त कराल, त्यावेळी त्यांना रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका.
१४
तर तुम्ही तुमच्या गुरांच्या कळपातून, तुमच्या खळ्यातून, तुमच्या द्राक्षारसाच्या कुंडातून उदारहस्ते द्यावे. ज्याप्रकारे याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादित केले आहे त्याप्रकारे त्यांना द्या.
१५
स्मरण ठेवा, तुम्हीही इजिप्त देशामध्ये गुलाम होता आणि याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमची सुटका केली. म्हणूनच मी आज तुम्हाला ही आज्ञा देत आहे.
१६
परंतु तुमच्या दासाची तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रीती असेल आणि त्याला तुमच्या घरी राहण्यात आनंद वाटत असेल आणि तो तुम्हाला म्हणेल की “तुम्हाला सोडून जाण्याची माझी इच्छा नाही,”
१७
तर आरी घेऊन, त्याचा कान दरवाजावर धरून, तो आरपार टोचावा. मग तो तुमचा कायमचाच दास होईल. तुमच्या दासीचेही असेच करावे.
१८
पण जेव्हा तुम्ही तुमच्या दासदासींना दास्यातून मुक्त कराल, तेव्हा वाईट वाटून घेऊ नये; कारण लक्षात ठेवा की, सहा वर्षात एखाद्या मोलकर्‍यासाठी जितका खर्च तुम्हाला आला असता, त्याच्या निम्म्याहूनही कमी खर्चात त्यांनी तुमचे काम केले आहे आणि त्यांना मुक्त करण्यासाठी तुम्ही जे काही कराल, त्याबद्दल याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करतील.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options