Skip to content
अनुवाद १०:१२-२२

अनुवाद १०:१२-२२

१२
आता हे इस्राएली लोकहो, याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्याजवळ मागतात ते एवढेच की तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे भय धरावे, त्यांच्या आज्ञा पाळाव्या, त्यांच्यावर प्रीती करावी आणि पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने याहवेह तुमच्या परमेश्वराची सेवा करावी,
१३
आणि याहवेहच्या ज्या आज्ञा व नियम आज मी तुम्हाला देत आहे, त्या तुमच्या भल्यासाठीच आहेत, त्या तुम्ही पाळाव्या.
१४
आकाश, सर्वोच्च आकाश, पृथ्वी व तिच्यावरील सर्वकाही याहवेह तुमच्या परमेश्वराचे आहे.
१५
असे असूनही याहवेहने तुमच्या पूर्वजांवर वात्सल्यमय प्रीती केली व त्यांच्यानंतर तुम्ही इतर सर्व राष्ट्रांहून श्रेष्ठ व्हावे म्हणून त्यांच्या वंशजांची म्हणजे तुमची निवड केली—जसे आजही आहे.
१६
म्हणून तुम्ही तुमच्या अंतःकरणाची सुंता करा आणि आता ताठ मानेचे राहू नका.
१७
याहवेह तुमचे परमेश्वर, हे देवाधिदेव, प्रभूंचे प्रभू, महान परमेश्वर, पराक्रमी आणि भयावह आहेत, जे पक्षपात करीत नाहीत व लाच घेत नाहीत.
१८
ते अनाथांचा व विधवांचा न्याय करतात, जे परदेशीय तुम्हामध्ये राहतात त्यांच्यावर प्रीती करून त्यांना अन्न व वस्त्रे देतात.
१९
तुम्हीदेखील परदेशीयांवर प्रीती केली पाहिजे, कारण तुम्ही स्वतः इजिप्त देशामध्ये परदेशी होता.
२०
याहवेह तुमच्या परमेश्वराचे तुम्ही भय बाळगा, त्यांची सेवा करा, त्यांना बिलगून राहा आणि त्यांच्याच नावाने शपथ घ्या.
२१
तेच तुमच्या स्तुतीचा विषय आहे; तेच तुमचे परमेश्वर आहेत, त्यांनी केलेले महान व भयावह चमत्कार तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिले आहेत.
२२
ज्यावेळी तुमचे पूर्वज इजिप्तमध्ये गेले, त्यावेळी ते केवळ सत्तर जणच होते आणि आता याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला आकाशातील तार्‍यांइतके अगणित केले आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options