1 राजे २२:१-१२
१
पुढील तीन वर्षात अराम व इस्राएलमध्ये युद्ध झाले नाही.
२
पण तिसर्या वर्षी यहूदीयाचा राजा यहोशाफाट इस्राएलच्या राजाला भेटण्यास गेला.
३
इस्राएलचा राजा आपल्या अधिकार्यांना म्हणाला, “रामोथ गिलआद आपलेच आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय आणि तरीही अरामाच्या राजाकडून ते परत घेण्यास आपण काहीही का करत नाही?”
४
तेव्हा त्याने यहोशाफाटला विचारले, “तुम्ही माझ्याबरोबर रामोथ गिलआदविरुद्ध युद्ध करण्यासाठी जाल का?” यहोशाफाटने इस्राएलच्या राजाला उत्तर दिले, “तुम्ही जसे आहात तसाच मी आहे आणि माझे लोक तुमचे लोक आहेत, जसे माझे घोडे तसेच ते तुमचेही घोडे आहेत.”
५
परंतु यहोशाफाट इस्राएलच्या राजाला असे सुद्धा म्हणाला, “प्रथम याहवेहचा सल्ला घ्या.”
६
तेव्हा इस्राएलच्या राजाने सुमारे चारशे संदेष्ट्यांना एकत्र बोलाविले आणि त्यांना विचारले, “मी रामोथ-गिलआदच्या विरुद्ध युद्धास जावे की नाही?” ते म्हणाले, “जा, कारण प्रभू ते राजाच्या हाती देतील.”
७
परंतु यहोशाफाटने विचारले, “आपण विचारावे असा याहवेहचा एकही संदेष्टा येथे नाही काय?”
८
इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला, “ज्याच्याद्वारे आपण याहवेहचा सल्ला घेऊ शकतो असा एक संदेष्टा अजूनही आहे, परंतु तो माझ्याविषयी कधीही चांगला संदेश देत नाही, नेहमीच वाईट संदेश देतो, म्हणून मला त्याचा तिरस्कार वाटतो. तो इम्लाहचा पुत्र मिखायाह आहे.” यहोशाफाटने उत्तर दिले, “राजाने असे बोलू नये.”
९
तेव्हा इस्राएलच्या राजाने आपल्या एका अधिकार्याला बोलाविले व म्हटले, “लवकर जाऊन इम्लाहचा पुत्र मिखायाह याला घेऊन ये.”
१०
इस्राएलचा राजा आणि यहूदीयाचा राजा यहोशाफाट आपली राजवस्त्रे परिधान करून शोमरोनाच्या प्रवेशद्वाराजवळील खळ्याजवळ त्यांच्या सिंहासनांवर बसले होते आणि संदेष्टे त्यांच्यासमोर संदेश देत होते.
११
तेव्हा केनानाहचा पुत्र सिद्कीयाह याने लोखंडाची शिंगे तयार केली होती आणि त्याने जाहीर केले, “याहवेह असे म्हणतात: ‘या शिंगांनी तू अरामी लोकांवर असा वार करशील की त्यांचा नाश होईल.’ ”
१२
इतर सर्व संदेष्टे सुद्धा तीच भविष्यवाणी करीत होते, ते म्हणाले, “रामोथ-गिलआदवर हल्ला करून विजयी हो, कारण याहवेह ते राजाच्या हाती देणार आहे.”
Settings