स्तोत्रसंहिता ६४
गुप्त शत्रूंपासून सुटकेसाठी प्रार्थना १–६
१
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, माझे गार्हाणे ऐका; शत्रूंच्या भयापासून माझ्या जिवास सुरक्षित ठेवा.
२
दुष्टांच्या षडयंत्रापासून आणि गुन्हेगार टोळक्यांच्या कारस्थानापासून मला लपवा.
३
तलवारीप्रमाणे ते आपल्या जिभांना धारदार करतात आणि बाणांप्रमाणे तीक्ष्ण असलेल्या कटुशब्दांनी लक्ष्य करतात.
४
दबा धरून ते निरपराध्यांवर बाण सोडतात; ते निर्भयपणे अकस्मात त्यांच्यावर मारा करतात;
५
दुष्कृत्य करण्यास ते एकमेकांना प्रोत्साहन देतात; सापळे आखण्यासाठी ते गुप्तपणे एकत्र जमतात; ते म्हणतात, “ते कोण पाहणार?”
६
ते कुटिल योजना बनवून म्हणतात, “आता आम्ही उत्तम योजना तयार केली आहे!” मानवी अंतःकरण आणि हृदय समजणे कठीण आहे.
देवाचा आकस्मिक न्याय व निर्दोषत्वसिद्धी ७–१०
७
परंतु स्वतः परमेश्वरच त्यांचा बाण मारतील; अचानक ते घायाळ होतील.
८
परमेश्वर त्यांची जीभ त्यांच्याच विरुद्ध करतील आणि त्यांचा नाश करतील. जे सर्व त्यांना पाहतील, ते उपहासाने आपले डोके हालवतील.
९
मग सर्व मानव घाबरतील; ते परमेश्वराच्या कृत्यांची थोरवी गातील; आणि त्यांनी केलेल्या चमत्काराविषयी मनन करतील.
१०
पण नीतिमान लोक याहवेहमध्ये आनंद करतील व त्यांचा आश्रय घेतील, सरळ हृदयाचे त्यांचे स्तवन करतील!
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Study note