Skip to content

स्तोत्रसंहिता १३

त्यागले गेल्याचा आक्रोश १–२

१
संगीत दिग्दर्शकासाठी; दावीदाचे स्तोत्र. याहवेह, आणखी किती काळ? सर्वकाळ तुम्ही मला विसरणार का? किती काळ तुम्ही मजपासून तुमचे मुख लपविणार?
२
मी किती काळ माझ्या विचारांशी द्वंद करावे? कुठवर दुःखाने रात्रंदिवस माझे हृदय व्यापून टाकावे? कुठवर माझ्या शत्रूंनी मजवर वरचढ व्हावे?

दैवी हस्तक्षेपासाठी विनंती ३–४

३
याहवेह, माझ्या परमेश्वरा, मजकडे पाहा आणि मला उत्तर द्या. या अंधारात माझ्या डोळ्यांना प्रकाश द्या, नाहीतर मजवर चिरनिद्रा ओढवेल.
४
माझे शत्रू म्हणतील “मी त्याला पराभूत केले आहे,” आणि माझ्या पतनाबद्दल ते आनंदित होतील.

विश्वास व स्तुतीकडे वळणे ५–६

५
कारण तुमच्या निरंतर प्रीतीवर मी भरवसा ठेवला आहे; माझे हृदय तुमच्या तारणात हर्ष करीत आहे.
६
मी याहवेहची स्तुती गाईन, कारण त्यांनी माझ्यावर उपकार केले आहेत.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.