स्तोत्रसंहिता ११२
परमेश्वराचे भय बाळगण्याचे आशीर्वाद १–३
१
याहवेहचे स्तवन करा. याहवेहचे भय बाळगणारे, आणि त्यांच्या आज्ञापालनामध्ये आनंद मानणारे आशीर्वादित आहेत.
२
त्यांची संतती पृथ्वीवर अतिथोर होईल; नीतिमानाची पिढी आशीर्वादित होईल.
३
संपत्ती व समृद्धी त्यांच्या घरात वास करतील, आणि त्यांची धार्मिकता चिरकाल टिकून राहील.
दयाळू मनुष्याचे चरित्र ४–५
४
सात्विकासाठी अंधकारातही प्रकाश उदय पावतो; ते कृपावान, दयाळू व नीतिमान असतात.
५
ज्यांचे अंतःकरण उदार असून ते मुक्तपणे उसने देतात त्यांचे भले होते, जे आपला व्यवहार न्यायाने करतात.
नीतिमानांची सुरक्षितता व दुष्टांचे भवितव्य ६–१०
६
निश्चितच, नीतिमान कधीही पथभ्रष्ट होणार नाही; त्यांना सर्वकाळ स्मरणात ठेवले जाईल.
७
वाईट बातमी त्यांना भयभीत करणार नाही; याहवेहवर पूर्ण भरवसा असल्याने त्यांचे मन स्थिर असते.
८
यामुळेच त्यांचे अंतःकरण सुरक्षित असते, ते भयग्रस्त होत नाहीत; शेवटी तेच आपल्या शत्रूंवर विजयान्वित दृष्टी टाकतील.
९
गरजवंतांना ते उदारहस्ते दानधर्म करतात, त्यांची नीतिमत्ता चिरकाळ टिकते; गौरवाने त्यांचे शिंग उंचावले जाईल.
१०
दुष्ट मनाची माणसे हे सर्व पाहून क्रुद्ध होतील; ती संतापाने दातओठ खातील व दुर्बल होतील, आणि त्यांच्या सर्व अभिलाषा नष्ट होतील.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Study note