Skip to content
लेवीय २०:१०-२१

लेवीय २०:१०-२१

१०
“ ‘जर कोणी व्यक्ती दुसर्‍याच्या पत्नीबरोबर व्यभिचार करतो—आपल्या शेजार्‍याच्या पत्नीबरोबर व्यभिचार करतो—त्या व्यभिचारी आणि व्यभिचारिणी दोघांनाही जिवे मारावे.
११
“ ‘जो व्यक्ती आपल्या पित्याच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवतो, तो आपल्या पित्याचा अपमान करतो. त्या व्यक्तीला व त्या स्त्रीला अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्ताचा दोष त्यांच्याच माथी राहील.
१२
“ ‘एखाद्या व्यक्तीने आपल्या सुनेबरोबर शारीरिक संबंध ठेवले, तर त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांनी जे केले ते विकृत आहे; त्यांच्या रक्ताचा दोष त्यांच्याच मस्तकी राहील.
१३
“ ‘जर एखादा पुरुष जसे एखाद्या स्त्रीसोबत तसे दुसर्‍या पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवतो, तर त्या दोघांनीही घृणास्पद कृत्य केले आहे. त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्ताचा दोष त्यांच्याच मस्तकी राहील.
१४
“ ‘एखाद्या व्यक्तीने एखाद्या स्त्रीबरोबर विवाह करून तिच्या आईबरोबरही विवाह केला, तर ती भयंकर दुष्टता आहे. तुमच्यातील ही दुष्टता निपटून काढण्यासाठी त्या पुरुषाला व त्या दोन्ही स्त्रियांना अग्नीत जाळून टाकावे.
१५
“ ‘एखाद्या व्यक्तीने प्राण्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, तर त्या व्यक्तीला जिवे मारावे; त्या पशूलाही ठार करावे.
१६
“ ‘जर एखादी स्त्री एखाद्या प्राण्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी गेली तर ती स्त्री आणि तो प्राणी दोघांनाही मारून टाका. त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्ताचा दोष त्यांच्याच मस्तकी राहील.
१७
“ ‘एखाद्या व्यक्तीने आपल्या बहिणीबरोबर मग ती त्याच्या पित्याची किंवा आईची कन्या असो, विवाह केला आणि त्यांनी शारीरिक संबंध ठेवले, तर ते अपमानास्पद आहे. त्यांना जाहीरपणे लोकांमधून काढून टाकावे. कारण त्याने आपल्या बहिणीचा अपमान केला आहे आणि त्यासाठी तोच जबाबदार राहील.
१८
“ ‘एखादी स्त्री ॠतुमती असताना तिच्याबरोबर एखाद्या व्यक्तीने शारीरिक संबंध ठेवले, तर त्याने तिच्या प्रवाहाचा स्त्रोत उघड केला आहे आणि तिने देखील ते उघड केले आहे. तर दोघांनाही समुदायामधून बहिष्कृत करावे.
१९
“ ‘आईच्या किंवा वडिलांच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नका, कारण त्यामुळे जवळच्या नातेवाईकाचा अपमान होईल; त्यांना आपल्या पापाचा भार वाहावा लागेल.
२०
“ ‘एखाद्या व्यक्तीने आपल्या वडिलांच्या भावाच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवले, तर त्याने त्याच्या वडिलांच्या भावाचा अपमान केला आहे. त्यांना जबाबदार धरले जाईल; ते निःसंतान मरतील.
२१
“ ‘एखाद्या व्यक्तीने आपल्या भावाच्या पत्नीसोबत विवाह केला, तर ते अशुद्धपणाचे कृत्य होय; त्याने आपल्या भावाचा अपमान केला आहे. ते निःसंतान राहतील.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options