योहान ५:३१-४७
३१
“जर मी स्वतःविषयी साक्ष दिली, तर माझी साक्ष खरी ठरणार नाही.
३२
परंतु दुसरा एक आहे जो माझ्या बाजूने साक्ष देतो आणि त्याने जी साक्ष माझ्याबद्दल दिली, ती खरी आहे.
३३
“तुम्ही लोकांना योहानाकडे पाठविले आणि त्याने सत्याविषयी साक्ष दिली
३४
मी मनुष्याची साक्ष स्वीकारतो असे नाही; मी हे यासाठी सांगत आहे की त्याद्वारे तुमचे तारण व्हावे.
३५
योहान एक ज्वलंत दिवा होता आणि तुम्ही त्याच्या प्रकाशाचा आनंद घेण्याचे मान्य केले.
३६
“माझी जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा वजनदार आहे. कारण जी कामे पूर्ण करण्याचे मला पित्याने सोपविले आहे, तीच कार्ये मी करीत आहे व ती साक्ष देतात की पित्यांनीच मला पाठविले आहे.
३७
ज्या पित्याने मला पाठविले त्यांनी स्वतःच माझ्याबद्दल साक्ष दिली आहे. तुम्ही त्यांची वाणी कधीही ऐकली नाही आणि त्यांची आकृती पाहिली नाही,
३८
त्यांचे वचन तुम्हामध्ये राहत नाही, कारण ज्याला त्यांनी पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला नाही.
३९
तुम्ही मेहनतीने शास्त्रलेख शोधून पाहता, कारण त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे, असे तुम्हाला वाटते. तेच शास्त्रलेख माझ्याबद्दल साक्ष देतात;
४०
तरी जीवनप्राप्ती साठी तुम्ही माझ्याकडे येत नाही.
४१
“मी मनुष्याचे गौरव स्वीकारीत नाही,
४२
परंतु मी तुम्हाला ओळखतो व मला चांगले माहीत आहे की तुमच्या हृदयात परमेश्वराची प्रीती नाही.
४३
कारण मी पित्याच्या नावाने आलो, पण तुम्ही माझा स्वीकार केला नाही; परंतु जर स्वतःच्याच नावाने दुसरा कोणी आला, तर तुम्ही त्याला स्वीकाराल.
४४
जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा स्वीकारता परंतु जो एकच परमेश्वर, त्यांच्याकडून प्रशंसा मिळविण्याचा प्रयत्न करत नाही, त्या तुम्हाला विश्वास तरी कसा ठेवता येईल?
४५
“परंतु मी पित्यासमोर तुम्हाला दोषी ठरवेन असा विचार करू नका. कारण ज्याच्यावर तुम्ही आशा ठेवली आहे तो मोशेच तुम्हाला दोषी ठरवेल.
४६
तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला, तर माझ्यावरही ठेवला असता, कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे.
४७
परंतु ज्याअर्थी तुम्ही त्याच्या लिखाणावर विश्वास ठेवीत नाही, त्याअर्थी मी जे सांगतो त्यावर विश्वास कसा ठेवाल?”
Settings