योहान ५:१९-२४
१९
येशूंनी त्यांना असे उत्तर दिले: “मी तुम्हाला निश्चित सांगतो, पुत्राला स्वतः होऊन काही करता येत नाही; तो पित्याला जे काही करताना पाहतो, तेच तो करतो, कारण जे काही पिता करतो, तेच पुत्रही करतो.
२०
पिता पुत्रावर प्रीती करतो आणि तो जे करतो ते सर्व पुत्राला विदित करतो. होय आणि तो याहूनही मोठी कृत्ये त्याला दाखवेल व त्यामुळे तुम्ही चकित व्हाल.
२१
कारण जसा पिता मेलेल्यास उठवून जीवन देतो, तसा पुत्रही त्याच्या मर्जीप्रमाणे ज्यांना पाहिजे त्यांना जीवन देतो.
२२
याशिवाय, पिता कोणाचाही न्याय करीत नाही, तर सर्व न्याय करण्याचे काम त्याने पुत्राकडे सोपविले आहे,
२३
यासाठी की जसा पित्याचा तसा सर्वांनी पुत्राचाही सन्मान करावा, जो पुत्राचा सन्मान करीत नाही तो, ज्याने पुत्राला पाठविले त्या पित्याचाही सन्मान करीत नाही.
२४
“मी तुम्हाला निश्चित सांगतो, जो कोणी माझे वचन ऐकतो आणि ज्यांनी मला पाठविले त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याचा न्याय होणार नाही, तर त्याने मरणातून पार होऊन जीवनात प्रवेश केला आहे.
Settings