Skip to content
यिर्मयाह २३:१-८

यिर्मयाह २३:१-८

“धिक्कार असो त्या मेंढपाळांवर जे माझ्या कुरणातील मेंढरांचा नाश करतात व त्यांची पांगापांग करतात!” असे याहवेह जाहीर करतात.
म्हणून याहवेह, इस्राएलचे परमेश्वर मेंढपाळांना जे माझ्या लोकांची राखण करतात त्यांना असे म्हणतात: “कारण तुम्ही माझ्या कळपाची पांगापांग केली व त्यांना हुसकून लावले आणि त्यांची काळजी घेतली नाही, आता तुम्ही त्यांच्याशी केलेल्या दुष्टपणाबद्दल मी तुमच्यावर शिक्षांचा वर्षाव करेन.” असे याहवेह जाहीर करतात.
“जिथे माझ्या कळपाला मी पाठविले आहे, तिथून मी माझ्या कळपाच्या अवशेषाला त्या सर्व देशातून एकत्र करून पुन्हा त्यांच्या मेंढवाड्यात आणेन आणि मग ती मेंढरे फलद्रूप होतील व त्यांची संख्यावाढ होईल.
त्यांची काळजी घेण्यासाठी मी असे मेंढपाळ नेमीन, जे त्यांचे संगोपन करतील, व त्यांना पुन्हा भीती आणि दहशत वाटण्याचे कारण राहणार नाही, तसेच त्यातील कोणी हरविणारही नाही,” असे याहवेह जाहीर करतात.
याहवेह म्हणतात, “असे दिवस येत आहेत की, त्या समयी मी दावीदातून एक नीतिमान शाखा पुन्हा उगवेन, तो राजा सर्व देशात सुज्ञतेने, खरेपणाने आणि न्यायाने राज्य करेल.
तेव्हा यहूदीयाचे रक्षण होईल आणि इस्राएल सुरक्षिततेने जगेल. याहवेह आमचे नीतिमान तारणकर्ता या नावाने त्यांना संबोधित करण्यात येईल.
“असे दिवस येत आहेत की,” याहवेह म्हणतात, “शपथ घेताना इस्राएलचे लोक, ‘ज्या जिवंत याहवेहने इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणले, त्यांच्या जीविताची शपथ’ असे न म्हणता,
‘ज्या जिवंत याहवेहने इस्राएली लोकांच्या वंशजांना उत्तरेकडील भूमीतून आणि ज्या वेगवेगळ्या देशात पांगविले होते, त्या देशातून परत आणले आहे. त्या जिवंत परमेश्वराची शपथ’ असे म्हणतील. मग ते स्वतःच्या भूमीवर वस्ती करतील.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options