यशायाह १०:२०-२७
२०
त्या दिवशी इस्राएलचे अवशिष्ट, जिवंत राहिलेले याकोबाचे लोक, ज्याने त्यांना मारून टाकले त्याच्यावर यापुढे अवलंबून राहणार नाहीत, परंतु याहवेह, इस्राएलच्या पवित्र परमेश्वरावर ते खरोखरच भरवसा ठेवतील.
२१
याकोबाचा राहिलेला प्रत्येकजणही परत येईल, सर्वसमर्थ परमेश्वराकडे परत येईल.
२२
हे, इस्राएला, तुझे लोक समुद्राच्या वाळूच्या कणासारखे असली तरी, उरलेलेच मात्र परत येतील. नाश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, परिपूर्ण आणि न्याययुक्त.
२३
प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, नाश करण्याचा हुकूमनामा संपूर्ण देशामध्ये अंमलात आणतील.
२४
म्हणून प्रभू, सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “माझे लोकहो, जे तुम्ही सीयोनमध्ये राहता, अश्शूरी लोकांना घाबरू नका, जे तुम्हाला दांडक्याने मारतात. आणि इजिप्तने केले त्याप्रमाणे तुमच्याविरुद्ध सोटा उगारतात.
२५
तुमच्याविरुद्ध असलेला माझा राग लवकरच संपेल आणि माझा क्रोध त्यांच्या नाशाच्या मार्गाकडे वळेल.”
२६
सर्वसमर्थ याहवेह त्यांना चाबकाने फोडून काढतील, जसे त्यांनी मिद्यानाला ओरेबच्या खडकावर मारले होते; आणि ते त्यांची काठी पाण्यावर उंच करतील, जसे त्यांनी इजिप्तमध्ये केले होते.
२७
त्या दिवशी त्यांचे ओझे तुमच्या खांद्यावरून, त्यांचे जू तुमच्या मानेवरून काढून घेतले जाईल. तुमच्या खांद्यावरून जू तुटले जाईल.
Settings