उत्पत्ती ३:१४-२४
१४
याहवेह परमेश्वर सर्पाला म्हणाले, “कारण तू हे केलेस म्हणून, “तू सर्व पाळीव प्राण्यांहून, आणि सर्व वन्यपशूहून अधिक शापित आहेस! तू तुझ्या पोटावर सरपटशील आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस माती खाशील.
१५
तू आणि स्त्री, तुझी संतती आणि तिची संतती यामध्ये मी शत्रुत्व निर्माण करेन; तिचे संतान तुझे मस्तक चिरडेल आणि तू त्याची टाच फोडशील.”
१६
नंतर परमेश्वर स्त्रीला म्हणाले, “तुझ्या प्रसूतिकाळात मी तुझे क्लेश अत्यंत वाढवेन; वेदनांनी तू तुझ्या संतानास जन्म देशील, तुझ्या पतीकडे तुझी ओढ राहील, आणि तो तुजवर सत्ता गाजवील.”
१७
नंतर ते आदामाला म्हणाले, “तू तुझ्या पत्नीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस, अशी मी तुला आज्ञा केली होती, ते खाल्लेस म्हणून आता, “तुझ्यामुळे भूमी शापित झाली आहे; तू तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस अत्यंत क्लेशमय कष्ट करून तिचा उपज खाशील.
१८
भूमी तुझ्यासाठी काटे आणि कुसळे उगवील, आणि तू शेतातील पीक खाशील.
१९
ज्यामधून तू घडविला गेलास त्या मातीत परत जाऊन मिळेपर्यंत तू घाम गाळून अन्न खाशील, कारण तू माती आहेस आणि तू मातीतच परत जाऊन मिळशील.”
२०
आदामाने आपल्या पत्नीचे नाव हव्वा असे ठेवले, कारण ती सर्व सजिवांची माता होती.
२१
याहवेह परमेश्वराने आदामासाठी आणि त्याच्या पत्नीसाठी चर्मवस्त्रे केली आणि त्यांना ती घातली.
२२
नंतर याहवेह परमेश्वर म्हणाले, “पाहा, मानव आपल्यापैकी एक आणि आपल्यासारखा झाला आहे; तो बरे आणि वाईट यातील फरक समजू लागला आहे. परंतु आता जीवनवृक्षाचे फळ त्याच्या हाती लागून त्याने ते तोडून खाऊ नये, कारण मग तो सदासर्वकाळ जिवंत राहील.”
२३
म्हणून याहवेह परमेश्वराने मनुष्याला ज्या भूमीतून निर्माण केले होते तिची मशागत करण्यासाठी त्या एदेन बागेतून घालवून दिले.
२४
अशा रीतीने त्यांनी मनुष्याला एदेन बागेच्या बाहेर घालवून दिले आणि जीवनवृक्षाकडे कोणीही जाऊ नये यासाठी एदेन बागेच्या पूर्वेस करूबीम आणि प्रत्येक दिशेकडे फिरणारी एक ज्वालामय तलवार ठेवली.
Settings