Skip to content
उत्पत्ती १:११-२५

उत्पत्ती १:११-२५

११
मग परमेश्वराने म्हटले, “भूमीतून वनस्पतीचा उपज होवो: निरनिराळी रोपे व झाडे, फळे देणारी व त्या फळातच स्वजातीचे बीज असणार्‍या फळझाडांचा भूमीतून उपज होवो” आणि तसे घडून आले.
१२
भूमीने वनस्पतीचा उपज केला: फळे देणारी व त्या फळातच स्वजातीचे बीज असणारी फळझाडे भूमीने उपजविली. परमेश्वराने पाहिले की हे चांगले आहे.
१३
आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा तिसरा दिवस.
१४
त्यानंतर परमेश्वराने म्हटले: “दिवस आणि रात्र वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योती होवोत व त्या ॠतू, दिवस आणि वर्षे दाखविणारी चिन्हे होवोत.
१५
पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी त्या ज्योती आकाशमंडळात दीप होवोत” आणि तसे घडून आले.
१६
परमेश्वराने दोन मोठ्या ज्योती निर्माण केल्या—दिवसावर प्रभुत्व चालविण्यासाठी प्रखर आणि रात्रीवर प्रभुत्व चालविण्यासाठी सौम्य प्रकाश. त्यांनी तारेही निर्माण केले.
१७
परमेश्वराने त्या ज्योती पृथ्वीवर प्रकाश पाडण्यासाठी आकाशमंडळात ठेवल्या,
१८
दिवसावर व रात्रीवर प्रभुत्व चालविण्यासाठी आणि प्रकाश व अंधार वेगळे करण्यासाठी या ज्योती त्यांनी निर्माण केल्या. परमेश्वराने पाहिले की हे चांगले आहे.
१९
आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा चौथा दिवस.
२०
आणि परमेश्वराने म्हटले, “जलांमध्ये विपुल प्रमाणात जीवजंतू उत्पन्न होवोत आणि पक्षी पृथ्वीवर आकाशमंडळात विहार करोत.”
२१
सागरांमधील महाकाय प्राणी, तसेच जलांमध्ये संचार करणारे व सर्व जातीचे प्राणी त्यांनी उत्पन्न केले. तसेच पंख असलेले सर्व जातीचे पक्षीही त्यांनी उत्पन्न केले. परमेश्वराने पाहिले की हे चांगले आहे.
२२
परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला आणि ते म्हणाले, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, समुद्रातील जले भरून टाका आणि पृथ्वीवर पक्ष्यांची वृद्धी होवो.”
२३
आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पाचवा दिवस.
२४
मग परमेश्वराने म्हटले, “प्रत्येक जातीच्या जिवंत प्राण्याची निर्मिती होवो: गुरे, जमिनीवरील सरपटणारे प्राणी, वनपशू यांच्या सर्व जाती पृथ्वीवर अस्तित्वात येवोत” आणि तसे घडून आले.
२५
परमेश्वराने वन्यप्राणी, पाळीव जनावरे, जमिनीवर सरपटत जाणारे सर्व प्राणी, त्यांच्या जाती प्रमाणे त्यांनी निर्माण केले आणि परमेश्वराने पाहिले की ते चांगले आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options